Kolhapur Police : करवीर पोलिस ठाण्याचे कामकाज शहरात; मात्र कार्यक्षेत्र शहराबाहेर | पुढारी

Kolhapur Police : करवीर पोलिस ठाण्याचे कामकाज शहरात; मात्र कार्यक्षेत्र शहराबाहेर

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कामकाज कोल्हापूर शहरात आणि कार्यक्षेत्र मात्र शहराबाहेर असलेले करवीर पोलिस ठाणेही शहराबाहेर हलविण्याची गरज निर्माण झाली आहे. शहराच्या प्रमुख वर्दळीचा मार्ग असलेल्या भाऊसिंगजी रोडवर या पोलिस ठाण्यामुळे गर्दीचा भार वाढत आहे. तो कमी करण्यासाठी करवीर पोलिस ठाणे शहराबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर तातडीने घेण्याची आवश्यकता आहे. (Kolhapur Police)

प्रत्येक तालुक्यात तहसीलदार कार्यालयासह पोलिस, कोषागार, दुय्यम निबंधक अशी महत्त्वाची शासकीय कार्यालये एकाच इमारतीत कार्यरत असतात. तालुक्यात येणार्‍या नागरिकांना महत्त्वाची कामे एकाच ठिकाणी करता यावीत, ही स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची संकल्पना आजही अनेक तालुक्यांत कायम आहे. मात्र, बदलत्या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी प्रत्येक कार्यालयासाठी स्वतंत्र इमारती होऊ लागल्या आहेत. त्याच पद्धतीने आता करवीर पोलिस ठाणेही स्वतंत्र होणे, त्याची इमारत शहराबाहेर होणे आवश्यक आहे.

तत्कालीन संकल्पनेनुसार करवीर पोलिस ठाणे करवीर तहसील कार्यालयाच्या इमारतीत आहे. कोल्हापूर शहराचा करवीर तालुक्यात समावेश आहे. यामुळे कोल्हापूर शहरातील नागरिकांचा तहसील कार्यालयाशी संबध येतो. मात्र, कोल्हापूर शहरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणी आहेत. त्यांच्या आणि करवीर पोलिस ठाण्याचा कामकाजासाठी तसा संबंध येत नाही. केवळ तहसील इमारतीत या पोलिस ठाण्याचे अस्तित्व आहे, कामकाज मात्र संपूर्ण शहराबाहेर करावे लागते. हे वास्तव आता स्वीकारण्याची गरज आहे. (Kolhapur Police)

करवीर पोलीस ठाण्याच्या दारातच वाहतुकीची कोंडी

पोलिस ठाण्यात येणार्‍यांची संख्या, त्यांची वाहने, विविध घटनांतील जप्त केलेला मुद्देमाल, अपघातील वाहने, पोलिसांची वाहने यासह तहसील कार्यालयात येणार्‍या नागरिकांची संख्या, त्यांची वाहने, याखेरीज या रस्त्यावरून सुरू असलेली एस.टी.,केएमटी ही सार्वजनिक वाहतूक, याखेरीज सर्वसामान्य वाहतूक यामुळे शिवाजी चौक ते सीपीआर हा मार्ग सदैव व्यस्त राहत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील भार वाढत जाऊन वाहतुकीची कोंडी होत आहे.

करवीर तहसील कार्यालयासह सीपीआर रुग्णालय शेजारी आहे. यामुळे या रस्त्यावरील वर्दळ कायम राहणारच आहे. भविष्यात ती आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. या सर्वांचा विचार करून या मार्गावरील अतिरिक्त भार कमी करण्याची गरज आहे. त्याकरिता करवीर पोलिस ठाण्याची इमारत अन्यत्र हलविण्याखेरीज अन्य पर्याय नाही. करवीर तहसील कार्यालयाची इमारत नव्याने बांधण्यात येणार आहे. मात्र, ही इमारतही भविष्याचा विचार केला तरी ती अपुरी पडू शकते. अशा परिस्थितीत याच ठिकाणी करवीर पोलिस ठाणे कार्यरत राहणे शहराच्या दळणवळणाच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरेल.

Kolhapur Police : करवीर तालुक्यात 131 गावांचा समावेश

तालुक्यात 131 गावांचा समावेश आहे. तालुक्याच्या शहराच्या पूर्वेकडील सर्व गावांसाठी गांधीनगर आणि गोकुळ शिरगाव ही दोन पोलिस ठाणी कार्यरत आहेत. दक्षिणेकडील गावांसाठी इस्पुर्लीला पोलिस ठाणे सुरू केले आहे. यामुळे करवीर पोलिस ठाण्यावर आता उत्तर आणि दक्षिणेकडील शहराबाहेरच्या गावांचा कार्यभार आहे.

या गावातील नागरिकांना पोलिस ठाण्यात दैनदिन कामकाजासाठी ये-जा करताना संपूर्ण शहराचा प्रवास करून यावे लागते. यासह एखादी घटना घडली तर पोलिसांनाही संपूर्ण शहरातून प्रवास करून बाहेर जावे लागते. त्यामुळे नागरिकांसह पोलिसांनाही हे पोलिस ठाणे गैरसोयीचे ठरत आहे. यामुळे करवीर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या गावांचा, परिसराचा विचार करून कळंबा ते फुलेवाडी या रिंगरोडवर जागा उपलब्ध झाली तर हे पोलिस ठाणे सर्वांसाठीच सोयीचे ठरणारे आहे.

या रिंगरोडमुळे करवीर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व परिसर आणि गावे जोडली जात आहेत. तसेच शहराबाहेर नवा रिंगरोडही होत आहे. त्यामुळे या परिसरात हे पोलिस ठाणे झाले तर नागरिकांची सोय होईलच; शिवाय शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल.

Kolhapur Police : दारात खून झाला तरी नोंद लक्ष्मीपुरीत

ठाण्याची मोठी गंमतच आहे. या पोलिस ठाण्याच्या दारात काहीही जरी झाले, अगदी खून झाला तरी त्याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात करावी लागते. तहसील कार्यालयात काही आंदोलन असले तरी लक्ष्मीपुरीचे पोलिस बोलवावे लागतात. शेजारीच असलेल्या सीपीआरमध्ये काही घडले तरीही करवीर पोलिसांना बघत राहण्याखेरीज काहीही करता येत नाही. केवळ या पोलिस ठाण्याची इमारतच शहराच्या हद्दीत येते, बाकी कामकाज शहाबाहेर.

ठाणे शहराबाहेर का?

ठाण्याचे सर्व कार्यक्षेत्र शहराबाहेर आहे. शहरासाठी स्वतंत्र चार पोलिस ठाणी आहेत. शहराच्या प्रमुख रस्त्यावर कार्यालय असल्याने वाहतुकीचा भार वाढत आहे. जप्त केलेली वाहने, अपघातील वाहने, जप्त मुद्देमाल ठेवण्यासाठी जागा नाही. कामकाजासाठी येणार्‍या नागरिकांकरिता हे गैरसोयीचे ठरणारे आहे.

ठाणे शहराबाहेर गेल्याने काय होईल

शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. कामकाजासाठी येणार्‍या नागरिकांचा वेळ आणि पैसा यामध्ये बचत होईल. पोलिसांनाही घटनास्थळी लवकर पोहोचता येईल.

Back to top button