राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘कोल्हापूर उत्तर’ शिवसेनेचा बालेकिल्‍ला | पुढारी

राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘कोल्हापूर उत्तर’ शिवसेनेचा बालेकिल्‍ला

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्‍ला असून त्यावर शिवसेनेचाच हक्‍क आहे. त्यामुळे ही पोटनिवडणुक मी लढवावी, असा शिवसैनिकांचा आग्रह आहे; पण निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर घेऊ, अशी भूमिका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केली.

उत्तर विधानसभा पोटनिवडणूक, महापालिका निवडणुकीसंदर्भात आणि पक्ष बांधणीसाठी शनिवार पेठेतील शिवसेना शहर कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत शिवसैनिकांनी काँग्रेस, राष्ट्रवादीने आपला वापर करून घेतला तर भाजपने विश्‍वास घात केल्याची टीका केली. त्यामुळे उत्तरची पोटनिवडणूक राजेश क्षीरसागर यांनी लढवावी, असा आग्रह केला.

भाजपकडून विश्‍वासघात व गद्दारीचे राजकारण

क्षीरसागर म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पदवीधर आमदार करताना शिवसैनिकांनी प्रयत्न केले. हे पाटील यांनी विसरून गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत विश्‍वासघात आणि गद्दारीचे राजकारण केले. त्यामुळेच माझा पराभव झाला. पराभव झालेल्या दुसर्‍या दिवसापासून मी पुन्हा कामाला सुरुवात केली. पडत्या काळातही संघटनात्मक बांधणी करून उत्तरमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. तरीही विरोधकांनी माझी बदनामी केली, त्याचा फटका मला विधानसभा निवडणुकीत बसला.

उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने निर्णय

कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक मी लढवावी, असा कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह आहे. या भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविणार आहे; पण पक्षप्रमुख जो आदेश देतील त्यानुसार पुढची वाटचाल असेल, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजप चालते.

पण शिवसेना चालत नाही. संघर्षमय निवडणुकीत शिवसेनेची त्यांना आठवण होते. कारण त्यांना सत्तेच पोहोचायचे असते, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.

यावेळी माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, किशोर घाटगे, दीपक गौड, पूजा भोर यांची भाषणे झाली. बैठकीला ऋतुराज क्षीरसागर, नंदकुमार मोरे, रघुनाथ टिपुगडे, सुनील जाधव, रवी चौगले, मंगल साळोखे आदी उपस्थित होते. शहरप्रमुख जयवंत हारुगले यांनी आभार मानले.

शिवसैनिकांनी ढोसणी दिली

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसैनिक बांधले गेले आहेत. अशी टीका केली जाते. विशेषतः खासदार संजय मंडलिक यांच्याबाबतीत फारच चर्चा होती; पण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत त्यांनी चमत्कार केला. दावणीला बांधलेला शिवसैनिकसुद्धा गप्प बसत नसतो, हे दाखवून देत तीन जागांवर विजय मिळवला. त्यामुळे शिवसेनेला बळ मिळाल्याचे माजी शहर प्रमुख इंगवले यांनी सांगितले.

Back to top button