Lok Sabha Election 2024 | लोकसभेनंतर उद्धव ठाकरेंकडे एकही खासदार शिल्लक राहणार नाही : नारायण राणे | पुढारी

Lok Sabha Election 2024 | लोकसभेनंतर उद्धव ठाकरेंकडे एकही खासदार शिल्लक राहणार नाही : नारायण राणे

चिपळूण शहर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री असताना मंत्रालयात केवळ दोन दिवस जाणार्‍या उद्धव ठाकरेंकडे चार खासदार शिल्लक राहिले आहेत. या निवडणुकीनंतर त्यांच्याकडे एकही खासदार शिल्लक राहणार नाही. स्वत:ची योग्यता नसताना दिल्लीतील रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करणारी भाषणे केली. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर चकार शब्दही काढला नाही, असा घणाघात महायुतीचे संभाव्य उमेदवार केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज (दि. 15) चिपळूण तालुका पूर्व विभाग महायुतीच्या मेळाव्यात केला.

पेढांबे येथील पुष्कर सभागृहात चिपळूण तालुका पूर्व विभागाचा महायुतीमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी खा. निलेश राणे, माजी आ. मधुकर चव्हाण, प्रमोद अधटराव, वसंत ताम्हणकर आदींसह महायुतीमधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी खा. निलेश राणे यांनी आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्यावर कडवट टीका केली. राऊत दोनवेळा खासदार झाले ते केवळ भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेमुळेच. गेल्या दहा वर्षांत राऊत यांनी मतदारसंघात काय काम केले? केवळ भजने व पेटी वाजविण्याचेच काम केले. या निवडणुकीत त्यांच्या हाती घंटा द्या. यानंतर माजी आ. मधुकर चव्हाण यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.

उद्योगमंत्री राणे म्हणाले की, या निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत. गेल्या दहा वर्षांत मोदी यांनी देशाचे नाव आणि मान जगात उंचावली आहे. विविध 54 योजनांच्या माध्यमातून देशातील सामान्य जनतेचा विकास केला. अन्नधान्यपासून ते आरोग्याच्या योजनेपर्यंत सामान्यांना सुविधा दिल्या. आता पुन्हा एकदा देश जगात आर्थिक स्तरावर प्रथम येण्यासाठी मोदी हे पंतप्रधान होणे गरजेचे आहे. गेल्या दहा वर्षांत येथील खासदारांनी काय केले? जिल्ह्यातील तरूण बेरोजगारच राहिला, उद्योग-व्यवसाय नाही, महामार्गाचे काम अपूर्ण, दरडोई उत्पन्न कमी अशी स्थिती या जिल्ह्याची आहे.

गेली 35 वर्षे मी राजकारणात जनतेच्या आशीर्वादाने आहे. आमदार ते मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा सातत्याने प्रवास केला. तीस वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे एक मागास जिल्हा अशी ओळख होती. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, रोजगार, आरोग्य, दरडोई उत्पन्न अशा सर्वच बाबतीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील अत्यंत मागास जिल्हा होता. मात्र, या जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची सुरुवात झाल्यानंतर हाच जिल्हा आता विकसीत आणि राज्यातील दरडोई जास्त उत्पन्न देणारा म्हणून ओळखला जात आहे. त्या मानाने रत्नागिरी जिल्ह्याची ओळख मात्र या विरोधात आहे. हे सर्व बदलायचे असेल आणि मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे असेल तर महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला विजयी करा, असे आवाहन केले.

Back to top button