Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election : रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम | पुढारी

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election : रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे पहिल्या टप्प्यातील जागावाटप निश्चित झाले आहे. पहिल्या टप्प्यातील केवळ जागा जाहीर होण्याची औपचारिकता बाकी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २२ जागा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खा. विनायक राऊत यांचेच नाव निश्चित असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार कोण ? केंद्रीय मंत्री नारायण राणे की उद्योजक किरण सामंत ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात गेली दोन टर्म ठाकरेंचे विश्वासु शिलेदार खा. विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. आता तिसर्‍यांदा त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे निश्चित आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आहे. तसेच शरद पवार यांची राष्ट्रवादीसुध्दा दुभंगली आहे. अशातच ही पहिली निवडणूक होत असल्याने लक्षवेधी ठरणार आहे. Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election

रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जवळपास निश्चित केल्याची चर्चा आहे. मात्र, रत्नागिरी – सिंधुदुर्ग हा शिवसेनेकडे मतदारसंघ असल्यामुळे शिवसेनेने आपला दावा कायम ठेवत उद्योगमंत्री किरण सामंत यांच्या नावाला अधिक पसंती दर्शविली आहे. मात्र, अद्यापही महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. दुसरीकडे, मात्र महाविकास आघाडी खासदार विनायक राऊत यांचे नाव निश्चित केले आहे. मात्र, अद्यापही महाविकास आघाडीकडून उमेदवार्‍यांची यादी अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election : भाजप उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयीश्री खेचून आणण्यासाठी तिसऱ्यांदा खासदार विनायक राऊत सज्ज झाले आहेत. माझ्याविरोधात कोणताही उमेदवार उभा राहू द्या, जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने आपण विजयी होणार आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. आता राऊत यांचा वारू रोखण्यासाठी महायुती कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार? भाजप की शिंदेंची शिवसेना ? याबाबत दिवसागणिक सस्पेन्स वाढत असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वांची उत्सुकता लागून राहिली आहे.

हेही वाचा 

Back to top button