सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्‍यातील खडपडे येथे पट्टेरी वाघाचे दर्शन | पुढारी

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्‍यातील खडपडे येथे पट्टेरी वाघाचे दर्शन

दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा दोडामार्ग तालुक्यातील खडपडे येथे आज (शनिवार) दिवसाढवळ्या एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख व त्यांच्या सहकाऱ्यांना हा वाघ दिसून आला. दिवसाढवळ्या वाघ दिसल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत काही कामानिमित्त शनिवारी सकाळी ११:३० वा.च्या सुमारास कारने तळकटहून कुंभवडेच्या दिशेने जात होते. या रस्त्यावरील खडपडे येथे त्यांची कार आली असता रस्त्यालगतच्या जंगलातील ओहोळातून एक पट्टेरी वाघ जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ कारचालकास कार थांबवण्यास व वाघ असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी वाघाची छबी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केली. त्याचे काही व्हिडिओ देखील काढले. वाहन थांबल्याचे पाहून वाघही काहीवेळ एका जाग्यावर स्तब्ध उभा राहिला. त्यानंतर वाघाने जंगलात धूम ठोकली. पंचक्रोशीत वाघाचा दिवसाढवळ्या वावर असल्याने परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button