CM Shinde : आगामी निवडणुकीत कोकणातील जनता शिवसेनेच्या मागे राहील : मुख्यमंत्री | पुढारी

CM Shinde : आगामी निवडणुकीत कोकणातील जनता शिवसेनेच्या मागे राहील : मुख्यमंत्री

राजापूर, पुढारी वृत्तसेवा : दीड वर्षापूर्वी सत्तेवर आल्यानंतर कोकणासह राज्याच्या संपूर्ण विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून आम्ही अनेक योजना राबविल्या. रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरु केले. मुंबई, ठाणे शिवसेनेचे शरीर आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही शिवसेनेची फुप्फुसे आहेत. आजवर कोकणी माणसाने शिवसेनेला जसे भरभरुन दिले, तशाच प्रकारे आगामी निवडणुकीत येथील जनता शिवसेनेच्या मागे भक्कम उभा राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  CM Shinde

राजापुरात आज (दि.८) शिवसेनेने शिवसंकल्प अभियान आयोजित केले होते. ‘मिशन ४६, शिवसंकल्प ध्येय भगवा महाराष्ट्राचे’ अशी शिवसेनेची संकल्प यात्रा सुरु झाली आहे. येथील राजीव गांधी मैदानात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठी सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. CM Shinde

या प्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार रविंद्र पाठक, माजी आमदार सदानंद चव्हाण, उद्योजक किरण सामंत, माजी महापौर मोरे, शशिकांत चव्हाण, उपनेत्या मिनाताई कांबळे, शितल म्हात्रे, रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख राहुल पंडीत, सिंधुदुर्गचे जिल्हा प्रमुख संजय आगट आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले. त्याचा चांगला फायदा राज्याला झाला. केंद्रातील सरकार आम्हाला भरभरुन निधी देत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होईल, तर राज्यात महायुतीचे ४५ खासदार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी केवळ ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ याव्यतिरिक्त काहीही केले नाही. मात्र, आपण सत्तेवर आल्यानंतर संपूर्ण राज्यातील जनता हेच आपले कुटुंब या धोरणातून झपाटून काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी राममंदिर बाबत तारीख नही बताऐंगे, असे हिणवणाऱ्या उध्दव ठाकरेंवर तोंडसुख घेतले. रखडलेला मुंबई- गोवा महामार्ग वर्षभरात मार्गी लागेल, असे सांगताना कोकणातील पर्यटन विकासाला चालना दिली जाईल, अशी ग्वाही दिली. तालुक्यातील महिला बचत विक्री केंद्रांसाठी एक कोटींच्या निधीची घोषणा केली.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मार्गदर्शन केले. राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, रविंद्र बावधनकर, पाचलचे माजी विभागप्रमुख गोपीनाथ उर्फ आप्पा साळवी, तळवडेच्या लोकनियुक्त सरपंच गायत्री साळवी आदीसह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा 

Back to top button