लवकरच राजकीय नाट्याचा तिसरा अंक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

लवकरच राजकीय नाट्याचा तिसरा अंक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यात झालेले सत्तांतर हा राजकीय नाट्याचा पहिला अंक होता. सध्या विकासकामांच्या माध्यमातून दुसरा अंक सुरू आहे. तर, तिसरा अंक लवकरच निवडणुका पार पडल्यानंतर पूर्ण होईल, असे सूतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि. 6) चिंचवड येथे केले. नाट्य कलावंतांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. वृद्ध कलावंतांच्या मानधनातही वाढ केली जाईल. त्याचप्रमाणे, कलावंतांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुलात शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन शनिवार (दि. 6) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर, रंगमंचाच्या पडद्याचे अनावरण संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी शिंदे बोलत होते. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जब्बार पटेल होते. मावळते संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, संमेलनाचे निमंत्रक तथा उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, अण्णा बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उद्योजक राजेश सांकला, कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात सुरुवातीला दीपप्रज्वलन, नटराज पूजन, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रेमानंद गज्वी यांच्या रंगनिरंग या आत्मकथनाचे या प्रसंगी प्रकाशन करण्यात आले. तर, ’रंगवाचा’ या नियतकालिकाचे आणि नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेची ’नांदी’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. पी. डी. पाटील, कृष्णकुमार गोयल, राजेश सांकला, राजेंद्र जैन आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी रंगभूमीने अनेक बदल पाहिले, पचविले. मराठी रंगभूमीला समृद्ध परंपरा आहे; तसेच ही रंगभूमी अनेक बोलीभाषांमुळे समृद्ध झाली आहे. शेअर मार्केटसारखे अनेक चढउतार नाट्यसृष्टीने अनुभवले आहेत. झाडीपट्टीची नाटके, जत्रांमधून सादर होणारी नाटके यांनी मराठी रंगभूमीला वेगळी उंची मिळवून दिली आहे. नेपथ्य, संगीत, सादरीकरण यांची चाकोरी मोडण्याचे काम मराठी रंगभूमीने केले आहे.

दरवर्षी नाट्य संमेलनाला 50 लाख रुपयांचा निधी दिला जातो. यंदा राज्य सरकारकडून 9 कोटी 80 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. तसेच, मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलासाठी 10 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे, नाट्यकलावंतांशी संबंधित विविध प्रश्न लवकरच बैठक घेऊन सोडविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.

अभिजात भाषेच्या दर्जासाठी प्रयत्न

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्याबाबत लवकरच मार्ग काढण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

नाटकात ’रिटेक’ची संधी नाही

आम्ही तीन तास अभिनय करतो, तर नेत्यांना 24 तास अभिनय करावा लागतो, असे अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले होते. हाच धागा पकडून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नाटकामध्ये लाईव्ह परफॉर्मन्स असतो. तेथे रिटेक घेण्याची संधी मिळत नाही. जिलेबीची तुलना ज्याप्रमाणे चित्राशी करता येत नाही, तसेच नाट्य अभिनयाचे आहे.

राजकारणातही काही धाडसी प्रयोग

जब्बार पटेल यांनी नाट्यक्षेत्रात धाडसी प्रयोग केले आहेत. तसेच, काही धाडसी प्रयोग राजकारणात देखील झाले आहेत. राज्यात झालेले सत्तांतर हा असाच एक प्रयोग होता. त्याची नोंद इतिहासात होईल. जब्बार पटेल यांनी या कथानकाचाही विचार करावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

प्रा. मोरे प्रेक्षागृहाला पूर्वीचेच भाडे

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाने वाढविलेले भाडे तसेच, विद्युत बिलासाठी आकारले जाणारे 14 हजार रुपये भाडे सर्वाधिक असल्याचे प्रशांत दामले यांनी नमूद केले होते. त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी आयुक्त सिंह यांना तत्काळ हे भाडे पूर्वीप्रमाणेच कमी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, त्यासाठी योग्य वीजबिल घ्यावे, असेही नमूद केले.

हेही वाचा

Back to top button