रत्नागिरीला 147 वर्षांनंतर मिळाले लेखा परीक्षक, लेखापाल | पुढारी

रत्नागिरीला 147 वर्षांनंतर मिळाले लेखा परीक्षक, लेखापाल

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  ब्रिटिशकालीन रत्नागिरी नगर परिषदेच्या 147 वर्षांनंतर लेखा विभागाला ‘अ’श्रेणीतील दोन लेखापाल व लेखा परीक्षक मिळाले आहेत. सातारा नगर परिषदेतील हिंमतराव पाटील आणि त्यांची पत्नी कल्याणी भाटकर अशी दोन्ही अधिकार्‍यांची नावे आहेत. हिंमतराव पाटील शुक्रवारी हजर होण्याची शक्यता असून, त्यांची पत्नी गेल्या महिन्यातच हजर होऊन प्रसूती रजेवर आहेत.
त्यामुळे नगरपरिषदेच्या लेखा विभागातील लेखापाल व लेखा परीक्षकाचा दुष्काळ संपुष्टात आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आर्थिक व्यवहार पाहणारा लेखा विभाग महत्त्वाचा असतो. रत्नागिरी नगरपरिषदेची स्थापना 1876 साली झाली असून, तेव्हापासून लेखापाल आणि लेखा परीक्षकाचे काम ‘ब’ श्रेणीतील अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली होत होते. सन 2008 मध्ये राज्य सेवा संवर्ग सुरू झाल्यानंतरही या नगरपरिषदेतील लेखा विभाग प्रभारी आणि ‘ब’ श्रेणीतील अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखालीच कार्यरत होता. परंतु, आता रत्नागिरी नगर परिषदेला दोन ‘अ’ श्रेणीतील लेखापाल व लेखा परीक्षक मिळाले आहेत.

रत्नागिरी नगरपरिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून इतर नगर परिषदांमधील लेखा विभागात कार्यरत अधिकार्‍यांकडे कार्यभार होता. सध्या राजापूर नगर परिषदेतील प्रथमेश फोडकर हे गेल्या वर्षभरापासून लेखा विभागात आठवड्यातील दोन दिवस कामकाज पाहत होते. आता मात्र नियमित लेखापाल व लेखा परीक्षक मिळाले आहेत. त्यामुळे या विभागातील रोजचे कॅशबुक, डे बुक, विविध कामांची बिले अदा करण्याची कामे वेगाने होणार आहेत.

Back to top button