तेरेखोल खाडीपात्रात अवैध वाळू उपसावर कारवाई; एक होडी जाळली, सात ताब्यात | पुढारी

तेरेखोल खाडीपात्रात अवैध वाळू उपसावर कारवाई; एक होडी जाळली, सात ताब्यात

सावंतवाडी/मळेवाड : आरोंदा, तळवणे परिसरात तेरेखोल खाडीपात्रात होणार्‍या अवैध वाळू उपसावर मंगळवारी पहाटे महसूल विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकत मोठी कारवाई केली. कारवाईत एक होडी जाळून खाक केली, तर सात होड्या व दीड ब्रास बेकायदा वाळू ताब्यात घेण्यात आली.

गेले कित्येक दिवस राजरोसपणे गोव्यातील वाळू माफिया महाराष्ट्र हद्दीलगत तेरेखोल खाडीपात्रात तळवणे व आरोंदा किनार्‍यालगत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करत असल्याच्या तक्रारी होत्या. या वाळू उपसामुळे स्थानिक मच्छी व्यवसाय धोक्यात आला होता. तसेच किनार्‍यालगतच्या कठड्याची धूप होत होती. यामुळे मंगळवारी महसूल विभागाकडून अचानक पहाटे धाड टाकत कारवाई करण्यात आली. यात एक होडी जाळून खाक करत दोन परप्रांतीय मजूर व सात होड्या ताब्यात घेण्यात आल्या. या होड्यांच्या कारवाईबाबत जाबजबाब व पंचयादी घातल्यानंतर सदरच्या होड्या मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या. तसेच दगडखोलवाडी येथील परप्रांतीयांसाठी बांधलेल्या झोपड्याही महसूल विभागाकडून उद्ध्वस्त करण्यात आल्या. कारवाई केलेल्या होड्यांवर महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई करणार असून यापुढे जर अवैध वाळू उपसा केल्यास यापेक्षा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अरुण उंडे यांनी सांगितले. ही कारवाई सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी मंडल अधिकारी आंबोली जी.आर. गुरव, आजगांव मंडल अधिकारी विनायक कोदे, तलाठी खान, तलाठी गोरे, तलाठी नागराज, तलाठी पाटोळे, तलाठी,तलाठी पास्ते, तलाठी गावडे, पोलिस उपनिरीक्षक यशवंते, पोलिस पी. बी. मुळे, तलाठी कविटकर, तलाठी सोन्सुरकर, तलाठी संदीप मुळीक, पोलिस पाटील गंगाराम जाधव आदी उपस्थित होते.

Back to top button