साई रिसॉर्ट पुढील महिन्यात जमीनदोस्त : किरीट सोमय्या | पुढारी

साई रिसॉर्ट पुढील महिन्यात जमीनदोस्त : किरीट सोमय्या

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणात शिवसेना नेते व माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यामुळे चर्चेत आलेल्या साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात आठ दिवसांत निविदा प्रक्रिया होईल आणि ऑक्टोबरमध्ये पाडण्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होईल असे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले. त्याचप्रमाणे संबंधित न्यायालयातील दोन याचिकांवर सुनावणी होऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाईही सुरु होईल असा विश्वासही सोमय्या यांनी व्यक्त केला.

बुधवारी रत्नागिरीत आलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मोहीमकुमार गर्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी दापोली मुरुड येथील साई रिसॉर्ट पाडण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीची त्यांनी माहिती घेतली. यानंतर शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ठाकरे सरकार मागील महिन्यात जमिनदोस्त झाले असून आता ऑक्टोबरमध्ये दोन्ही रिसॉर्ट जमीनदोस्त झालेली असतील. येत्या आठ ते दहा दिवसात रिसॉर्ट पाडण्याबाबत निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर रिसॉर्ट पाडण्यात आल्यावर त्याचा मलबा टाकण्यासाठी ठिकाणही निश्चित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे रिसॉर्ट अनधिकृतपणे बांधण्यात आले त्याचप्रमाणे सीआरझेडचा भंगही करण्यात आला. याबाबत वेगवेगळ्या याचिका खेड व दापोली न्यायालयात करण्यात आल्या आहेत. खेडमधील याचिका सहा महिन्यापूर्वी दाखल करण्यात आली. परंतु प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. परंतु 12 सप्टेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी होणार असून, अनधिकृत बांधकाम यात फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. दापोली न्यायालयातही 12 सप्टेंबरलाच सुनावणी आहे. या ठिकाणीही अनिल परब यांच्याविरोधात कारवाई सुरु होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सीआरझेडमधील बांधकाम केल्या प्रकरणात दापोलीत एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु तशाच प्रकरणात अगदी शेजारी असणार्‍या साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यावर कारवाई प्रशासनाने का केली नाही असा प्रश्नही सोमय्या यांनी उपस्थित केला. साई रिसॉर्ट प्रकरणात 15,800 स्क्वेअर फुटांचे बांधकाम करताना, रोख रकमेचा वापर करण्यात आला असल्याचा संशय असून या प्रापर्टीचा टॅक्सही अनिल परब यांनी भरला आहे. या प्रकरणातही आयकर विभागाकडून चौकशी सुरु झाली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, शहराध्यक्ष सचिन करमरकर, माजी नगरसेवक उमेश कुलकर्णी उपस्थित होते.

Back to top button