कोकण : आ.दीपक केसरकर यांच्या निषेधार्थ सावंतवाडीत मोर्चा | पुढारी

कोकण : आ.दीपक केसरकर यांच्या निषेधार्थ सावंतवाडीत मोर्चा

सावंतवाडी , पुढारी वृत्तसेवा : सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर हे शिंदे गटात गेल्याच्या विरोधात जिल्हाभरातील शिवसैनिक सोमवारी सावंतवाडीत एकवटले.शिवसैनिकांनी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढत आ. केसरकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

आ. केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट  निवासस्थान व कार्यालया समोरून हा मोर्चा जाणार असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी शिवसैनिकांनी आ.केसरकर यांच्या बंडखोरीचा तीव्र शब्दात निषेध करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. येथील राजा शिवाजी चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने  शिवसैनिक सहभागी झाले होते. आ. केसरकर यांच्या विरोधातील घोषणाबाजी व शिवसेनेच्या समर्थनाचा जयघोष यामुळे शहर परिसर दाणाणून गेला होता. भर पावसाची तमा न बाळगता हजारो शिवसैनिक या मोर्चात सहभागी झाले होते.  मोर्चा  जसा आ. केसरकर यांच्या निवासस्थाना समोर आला, तसतसे वातावरण गंभीर बनले.

खबरदारी म्हणून पोलिसांनी मोर्चाला चारही बाजूने वेढा दिला होता. तरीही संतप्त शिवसैनिकांनी आ. केसरकर यांच्या निवासस्थानासमोर थांबत तब्बल पाच मिनिटे जोरदार घोषणाबाजी केली. महिला शिवसैनिकांनी तर हाताने टाळ्या वाजवत आ. केसरकर यांचा बंडखोरीचा निषेध केला. शिवसैनिक तेथे थांबले तर काहीतरी अनुचित घडेल त्यामुळे पोलिसांनी मोर्चा तिथून पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. हा मोर्चा पुढे पुण्यश्‍लोक बापूसाहेब यांच्या पुतळ्या समोरून गांधी चौक येथे विसर्जित केला. तेथे शिवसेना नेत्यांनी मार्गदर्शन केले.

मोर्चात आ.वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, पर्यटन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर,नागेंद्र परब,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब, जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, यशवंत परब, बाबुराव धुरी, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, कन्हैया पारकर, अतुल रावराणे, सुकन्या नरसुले,जि.प.सदस्य मायकल डिसोझा, श्रृतिका दळवी, तालुका संघटक अर्पणा कोठावळे, रश्मी माळवदे, सचिन वालावलकर,अबजू सावंत, कुडाळचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, सागर नाणोसकर, शब्बीर मणियार आदिसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,  देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, राकेश नेवगी, काशिनाथ दुभाषी, संतोष जोईल, इफ्तिकार राजगुरू आदी सहभागी झाले होते.

कडेकोट पोलिस बंदोबस्त

आ. केसरकर यांच्यावर शिवसैनिकांचा असलेला वाढता रोष पाहता मोर्चाच्या निमित्ताने काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतो म्हणून पोलिसांनी वेळीच खबरदारी घेत बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक असे तब्बल दीडशे ते दोनशे पोलिस तैनात केले होते.  जिल्हा अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक नितीन बगाटे हे आ. केसरकर यांच्या निवासस्थानासमोर ठाण मांडून होते.त्यामुळे सावंतवाडी शहराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

माजी नगरसेवकांसह शहरप्रमुखाची रॅलीकडे पाठ

शिवसेनेच्या निषेध रँलीकडे माजी नगरसेवकांसह  शहरप्रमुखांनी पाठ फिरवली. त्यामुळे हे पदाधिकारी आ. केसरकर यांच्या सोबत राहतील, अशी चर्चा आहे. आ. केसरकर यांचे सावंतवाडीतील समर्थक तथा माजी नगरसेविका आनारोजीन लोबो, दिपाली सावंत, शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, माजी नगरसेवक आणि शिवसेना सावंतवाडी शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर अशा एकूण सात प्रमुख पदाधिकार्‍यांनी या रॅलीकडे  पाठ फिरवली. याशिवाय माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले नव्हते. त्यामुळ सावंतवाडीशहरातील त्यांचे समर्थक आ. केसरकरां सोबत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Back to top button