सिंधुदुर्ग: नगरोत्थान निधी पाण्यात घालण्याचा घाट! | पुढारी

सिंधुदुर्ग: नगरोत्थान निधी पाण्यात घालण्याचा घाट!

सिंधुदुर्ग पुढारी वृत्तसेवा: राज्य शासनाकडून कुडाळ नगरपंचायतला मंजूर झालेला 2 कोटी रुपयाचा नगरोत्थान निधी भंगसाळ नदिकिनारी गार्डन करून तो निधी पाण्यात घालण्याचे काम स्थानिक आमदारांकडून केले जात आहे. विशेष म्हणजे नगरपंचायत प्रशासनाने सुध्दा 10 कि.मी.च्या हद्दीत जागाच उपलब्ध नाही असा चुकीचा दाखला दिला आहे. हा सर्व प्रकार थांबावा यासाठी आम्ही विरोधी सर्व नगरसेवक जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार तसेच नगरविकास खात्याचेही लक्ष वेधणार आहोत. प्रसंगी तीव्र आंदोलन करणार, असा इशारा भाजप नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांनी दिला.

कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सौ. तेरसे बोलत होत्या. गटनेते विलास कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, नगरसेवक अभी गावडे, नीलेश परब, अ‍ॅड. राजीव कुडाळकर आदी उपस्थित होते.
तेरसे म्हणाल्या, कुडाळ शहरात गार्डन आवश्यक आहे, पण ते चुकीच्या ठिकाणी होऊ नये, गार्डन करायचेच असेल तर दुसर्‍या जागेत करा, आम्ही तुमचे स्वागत करू, कुडाळ शहरात प्लॉटिंग सोडलेल्या जागा 33 गुंठे पासून पुढे आहेत. तरी मुख्याधिकारी यांनी जागाच उपलब्ध नाही असा दाखला देणे कितपत योग्य आहे? गार्डन निर्मितीसाठी सन 2018 साली न.पं.ला 2 कोटीचा निधी प्राप्त झाला.

शहराच्या विकासासाठी त्या निधीचे आम्ही सर्व नगरसेवकांनी बसून नियोजन केले होते. मात्र आमदारांच्याच मागणी पत्रानुसार नाव बदलून लक्ष्मीवाडी भंगसाळ महापुरूष मंदिर उद्यानविद्या येथील भाग सुशोभिकरण करणे असे पत्र पाठविण्यात आले. या विरोधात न.पं. सर्वसाधारण बैठकीत प्रश्न उपस्थित झाला, त्याला सत्ताधारी म्हणून आम्ही विरोध केला. खरेतर ती जमीन महाराष्ट्र शासनाची नाही. मे 2021 मध्ये आमच्या कार्यकारिणीची मुदत संपली. त्यानंतर जून महिन्यात भूसंपादन करण्याचा प्रयत्न प्रशासनाला हाताशी धरून सुरू करण्यात आला.

आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती उपलब्ध केली असता आज घडीला तरी त्या ठिकाणी गार्डन झाले तर ते पाण्यात जाणार हे निश्चित आहे. एकूणच ती खासगी जागा खरेदीसाठी 2 कोटी रुपये टाकण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. त्या ठिकाणची जमीन वर्ग 1 करताना त्या जमीन मालकाने रस्ता करण्यासाठी असे नमूद केले आहे, एकूणच हा सारा पैसा पाण्यात जाणार असल्यामुळे आमचा त्या ठिकाणी निधी वापराला विरोध आहे.

खरं तर कुडाळ नगरपंचायतने सुध्दा 69 गुंठे जमीन खरेदी केलेली आहे. त्यामध्ये नाट्यगृह होत असून उर्वरित जागा गार्डनसाठी प्रस्तावित केलेली आहे. आमदारांनी आमच्या कार्यकाळात शिवसेना नगरसेवक सोडून एकाही वॉर्डात निधी दिला
नाही. आताही तसेच चित्र आहे. नगराध्यक्ष काँग्रेसच्या आहेत तर उपनगराध्यक्ष शिवसेनेचे असून आताच तीन कामे उपनगराध्यक्षांच्या वॉर्डमध्ये देण्यात आली आहेत, असे सांगितले.

सपाटीकरणासाठी 35 लाख रुपये मंजूर का?

कुडाळ येथील क्रीडांगणाच्या सपाटीकरणासाठी जिल्हा विभागाकडून आतापर्यंत गेल्या 3 वर्षात 55 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. असे असताना त्या ठिकाणचा पोल हटविणे, गटर बांधणे व सपाटीकरणासाठी नगरपंचायतच्या नगरोत्थान निधीमधून 35 लाख रुपये खर्च करण्याचे प्रयोजन काय? असा सवालही संध्या तेरसे यांनी करत प्रशासनाला हाताशी धरून चुकीची कामे केली जात असल्याचा आरोप केला.

Back to top button