औरंगाबाद : प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईचा मुलीनेच काढला काटा | पुढारी

औरंगाबाद : प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईचा मुलीनेच काढला काटा

औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : प्रेमात अडसर ठरते म्हणून मुलीने प्रियकर, मैत्रीण आणि प्रियकराच्या मित्राच्या मदतीने जन्मादात्या आईचा गळा चिरून खून केला. मृताच्या गळ्यावर तब्बल ८ वार केल्याचे समोर आले. सोमवारी (दि. ९) सकाळी ८ च्या सुमारास बाळापूर शिवारात महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर ही खळबळजनक घटना उघडकीस आली. चिकलठाणा पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत या खुनाचा उलगडा केला.

सुशीला संजय पवार (वय ३९, रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पतीचे निधन झालेले असून, त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकी परिसरात सुशीला या हातगाडीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होत्या. रविवारी रात्री ९ च्या सुमारास त्या एका मैत्रिणीच्या घरी गेल्या. तेव्हा त्या मैत्रिणीची मुलगी आणि सुशीला यांची मुलगी सोबतच होत्या. रात्री १० वाजता त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकशन दिसून येते. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. मृत महिलेची मुलगी व त्या मुलीच्या मैत्रिणीला घेऊन सुशीला पवार यांच्या नातेवाईक सुशीला या रात्री ज्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या त्यांच्या घरी गेले. तेथे नातलगांनी सुशीला पवार यांच्याविषयी चौकशी केली. पुढे तेथे योग्य माहिती मिळत नसल्याने व संशय आल्याने नातेवाईकांनी सुशीला यांचा शोध घेतला पण, त्यांचा शोध लागला नाही.

सोमवारी सकाळी बीड बायपास रोडवरील बाळापूर शिवारातील पी. बी. इस्टेट येथे नागरिकांना सुशीला यांचा मृतदेहच आढळला. मृतदेह असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक देविदास गात हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय जाधव हेदेखील घटनास्थळी दाखल झाले.

शेतात बोलावले अन् गळा चिरला

सुशीला पवार या बाळापूर शिवारातच शेती करत होत्या. रविवारी रात्री मुलीने त्यांना शेतात बोलावून घेतले. त्या स्कुटीवरून शेतात गेल्या. तेथे आधीपासूनच मुलगी, तिचा प्रियकर दीपक बचाटे (२४), त्याचा मित्र सुनील मेहर आणि मुलीची एक १५ वर्षांची मैत्रीण हे चौघे होते. त्यांनी प्रेमात अडसर ठरणाऱ्या सुशीला पवार यांच्यावर हल्ला चढविला. धारदार शस्त्राने त्यांच्यावर आठ वार करून त्यांचा गळा चिरला. त्यानंतर आईच्या स्कुटीवरूनच मुलगी आणि तिची मैत्रीण घरी आल्या. आरोपी दीपक बचाटे आणि सुनील मेहर तेथून निघून गेले. दीपक व त्याचा मित्र पहाटे दोन वाजता ते सुशीला यांच्या घरी गेले. त्यांनी दोघींना तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांनी त्यांना हाकलून दिले.

मोबाईल लोकेशनमुळे लावला छडा

मृत सुशीला यांचा मोबाईल रात्री दहा वाजेपर्यंत सुरु होता. त्यांचे शेवटचे लोकेशन शेतात असल्याचे आढळले. तसेच, मुलीनेच त्यांना कॉल केल्याचे तांत्रिक तपासातून उघड झाले. तसेच त्यांच्या मोबाईलवर कोणाकोणाचे फोन आले होते. त्या कोणाच्या संपर्कात होत्या. याविषयीचा सीडीआरही समोर आला. त्याआधारेच पोलिसांनी मुलगी, तिचा प्रियकर, तिची मैत्रीण आणि प्रियकराचा मित्र यांना चौकशीसाठी बोलावले. रात्री ८ वाजेच्या सुमारास या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले, अशी माहिती अपर अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी दिली.

मुलाचे २७ रोजी लग्न

मृत सुशीला पवार यांच्या मोठ्या मुलाचे २७ मे रोजी लग्न ठरलेले आहे. लग्नाच्या दृष्टीने त्यांची तयारीही सुरु होती. रविवारी मुलगा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला असताना त्यास आईने फोन करुन सोन्याची व्यवस्था झाली असून, सर्व सोने सोडवून आणले असल्याचे कळविले होते. त्या सोन्यासह काही रक्कमही गायब झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्याचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Back to top button