सानपवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार : सामूहिक राजीनाम्याचा इशारा | पुढारी

सानपवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार : सामूहिक राजीनाम्याचा इशारा

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : आनंदाचा शिधा घोटाळा प्रकरणात पाथर्डी तहसीलच्या पुरवठा विभागात पूर्वी कार्यरत असलेल्या काकासाहेब सानप या तरुणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. तर, या प्रकरणी आम्ही पैसे भरणार नसून, सानप याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करूच. मात्र, वेळ पडल्यास सामूहिक राजीनामे देण्याचाही निर्णय घेण्यात आला. या संदर्भात मंगळवारी संघटनेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब ढाकणे यांच्या कोरडगाव रस्त्यावरील कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस ढाकणे यांच्यासह संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी मोहिते, विष्णूपंत ढाकणे, महादेव कुटे, दिलीप वांढेकर, सुरेश नागरे, महादेव दहिफळे, गोरक्ष दहिफळे, विकास लवांडे, महादेव पवार, मारुती राठोड, मेजर अर्जुन शिरसाठ, मेजर साहेबराव गिते व जवळपास 75 स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

जवळपास पंचावन्न लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे या बैठकीत उघडकीस आले आहे. पुरवठा शाखेत काम करणार्‍या अधिकार्‍यांची सानप याच्याकडे पैसे देण्यास सांगितले होते व त्या नुसार आम्ही पैसे दिले. मग, आमचा काय दोष आहे. या घटनेला महसूल व पुरवठा विभागाचे अधिकारी जबाबदार असून सानपला आपल्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमध्ये कोणी घेतले, सानप याचे बँकेतील व मोबाईलमधील व्यवहार तपासल्यास, त्याने कोणत्या अधिकार्‍याला किती पैसे दिले ते बाहेर येईल, असे बैठकीत अनेक स्वस्त धान्य दुकानदार म्हणाले. आहे.
आनंदाच्या शिध्याचे पहिल्या हप्त्याचे आमचे पैसे थकले होते. तर, मग आम्हाला पुन्हा दोन वेळा का शिधा दिला. सानपने काहींना किमती वस्तू भेट दिल्या त्या कशा. आम्हाला जो माल दिला जातो, त्याचे वजन कमी असते.

हमाली देण्याचे आमचे काम नसतानाही आमच्याकडून हमाली घेतली जाते. माल कमी मिळतो याची माहिती व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर टाकल्यास अधिकारी दमदाटी करतात. महिलांना वाटण्यासाठी साड्या मागितल्या, तर अर्वाच्च भाषा वापरली जाते. आम्ही सानप याच्याकडे पैसे देऊनही आम्हाला पैसे भरा, अशा नोटिसा का पाठविल्या, अशा प्रश्नांची सरबत्ती दुकानदारांनी केली. या वेळी अनेकांनी आपल्या मोबाईलमधून सानप याला जे पैसे पाठविले होते, त्या व्यवहाराची कागदपत्रे या बैठकीत दाखविली. जवळपास 55 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे या बैठकीत उघडकीस आले आहे. दुकानदारांनी आनंदाच्या शिध्याचे सर्व पैसे भरूनही, त्यांना पुरवठा शाखेने पैसे भरण्याच्या नोटिसा पाठविल्या. यामुळे पुरवठा विभागातील सावळा गोंधळ उघडकीस आला आहे.

हेही वाचा

Back to top button