सोनई परिसरात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा : अवैध प्रवासी वाहतूक फोफावली | पुढारी

सोनई परिसरात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा : अवैध प्रवासी वाहतूक फोफावली

सोनई : पुढारी वृत्तसेवा : सोनई, घोडेगाव येथे वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध प्रवाशी वाहतुक करणार्‍या वाहनांनी मोठा कळस गाठला आहे. त्याचा ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रारी वाढत असताना नव्याने आलेल्या पोलिस अधिकार्‍यांनी अजूनही याची दखल घेतल्याचे दिसून येत नाही. पोलिसांचा अवैध प्रवाशी वाहतुकीवर कुठलाच अंकुश राहिलेला नाही. छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील पांढरीपूल, घोडेगाव, वडाळा, तसेच राहुरी-शिंगणापूर मार्गावर दिवसाढवळ्या वाहतूक होत असताना, पोलिसी कारवाईचा दंडुका मात्र म्यान झालेला दिसत आहे.

सोनई हे मोठ्या गर्दीचे ठिकाण आहे. शिंगणापूरमुळे शिर्डीहून येणार्‍या भाविकांची संख्या जास्त असल्याने या मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या वाहनामुळे अनेक वेळा अपघात होऊन, यात अनेकांचा बळी गेला आहे. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोनई-राहुरी रस्त्यावर व शुक्रवारी घोडेगावात दिसणारे वाहतूक पोलिस इतर दिवशी वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला असताना, तेथून गायबच असतात. वर्तमानपत्रात बातम्या आल्या की, थातूरमातूर कारवाई करून, पुन्हा अवैध वाहतुकीला पाठीशी घातले जाते, अशी अवस्था आहे.

बेशिस्त वाहतुकीने कळस गाठल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने, ऑटोचालकांच्या मनमानीमुळे सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. अवैध वाहतूक करणारी वाहने, ऑटो, दुचाक्या, मालवाहू वाहने वाटेल तिथे मनमानी पद्धतीने उभी केली जातात. प्रवासी मिळविण्यासाठी ही वाहने एकदम येऊन मधेच उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. वाहतुकीवर याचा परिणाम होत आहे. विविध ठिकाणी वर्दळीच्या मार्गावर अशी बेशिस्त वाहतूक असून, रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त वाहने उभी केली जातात.

सोनई-राहुरी रस्त्यावर सर्वाधिक शाळा, महाविद्यालय व कन्या विद्यालय आहे. या रस्त्यावरून शनिशिंगणापूरला जाणारे अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगात जातात. त्यांच्यावर कुणाचाच अंकुश नसल्याने जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते. या सर्व गोष्टीकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अवैध वाहतुकीकडे पोलिसांची डोळेझाक या रस्त्यांवर वाहतूक पोलिस उभे असताना, त्यांच्या डोळ्यादेखत कुठेही वाहने उभी केली जातात. अवैध वाहतूक करणारी वाहने प्रवाशांनी गच्च भरून पोलिसांच्या डोळ्यादेखत भरधाव धावतात. परंतु, पोलिस याकडे डोळेझाक करतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा

Back to top button