डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : लोकलमधील प्रवाशांचे मोबाईल खेचून पळणार्या सराईत चोरट्याला कल्याणच्या लोहमार्ग क्राईम ब्रँचने बेड्या ठोकून गजाजाड केले आहे. हा चोरटा आधारवाडी कारागृहात जमा करण्यात आला होता. क्राईम ब्रँचने ताब्यात घेऊन केलेल्या कारवाईत या चोरट्याकडून तब्बल 8 महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत.
संबंधित बातम्या
क्राईम ब्रँचकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान अन्सारी असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून तो भिवंडीत राहतो. काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या स्थानकांत मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. प्रवासी लोकल गाडी पकडण्याच्या तयारीत असताना हा चोरटा त्यांचे मोबाईल खेचून पळून जायचा. 19 जानेवारी रोजी कल्याण रेल्वे स्थानकात मोबाईल चोरीची घटना घडली होती. या प्रकरणात कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रँचच्या पथकानेही या प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला.
तपासादरम्यान सलमान हा चोरीच्या प्रकरणात आधारवाडी कारागृहात असल्याची माहिती समोर आली. क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अर्शद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक प्रकाश चौगुले, कर्मचारी राजेंद्र दीवटे,जर्नादन पुलेकर, अजय रौंधळ, रविंद्र दरेकर, वैभव जाधव, स्मिता बसावे, पद्मा केंजळे, महेंद्र कर्डीले, रविंद्र ठाकूर, हितेश नाईक, अजित माने, सोनाली पाटील, गोरख सुरवसे, अक्षय चव्हाण आणि सुनिल मागाडे यांनी चौकस तपास सुरू केला.
कारागृहातून ताबा घेऊन चौकशी सुरू केली असता सलमान याने कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल चोरल्याची कबूली दिली. त्याने केलेल्या चोर्यांच्या घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या होत्या. क्राईम ब्रँचने रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता त्यात सलमान दिसून आला. त्याच्याकडून प्रवाशांचे लांबविलेले आठ महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आल्याचे क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अर्शद शेख यांनी सांगितले.