अर्थसंकल्पात जुन्नरसाठी विकासकामांना मंजुरी : आ. अतुल बेनकेंची माहिती | पुढारी

अर्थसंकल्पात जुन्नरसाठी विकासकामांना मंजुरी : आ. अतुल बेनकेंची माहिती

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीत असलेले अजित पवार शेतकर्‍यांच्या प्रती लाभलेले चांगले नेतृत्व आहे. त्यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात झपाट्याने विकासकामे मंजूर होत असल्याची माहिती आ. अतुल बेनके यांनी दिली. त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, महिला जिल्हा सरचिटणीस उज्ज्वला शेवाळे, भाऊ देवाडे, पापा खोत, महिला तालुकाध्यक्ष सुप्रिया लेंडे, विकास दरेकर, प्रीतम काळे, अतुल भांबेरे, जयेश औटी, भाऊ कुंभार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बेनके म्हणाले, मी आमदार झाल्यापासून 37 किलोमीटरचे रस्ते पूर्ण केले.

नवीन 70 किलोमीटर रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, आचारसंहितेच्या अगोदर कामास मंजुरी मिळून कामे मार्गी लागतील. तालुक्यातील प्रत्येक धरणाचे मेकॅनिकल गेट्स, इलेक्ट्रॉनिक सिस्टिम व गळती बंद केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वडज धरणाशेजारी जलसंपदा विभागाच्या 25 हेक्टर जागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 150 कोटींचे शिवनेरी संग्रहालय उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच संग्रहालयाचा आराखडा पाहायला मिळेल.

पुढील निवडणूक लढविण्याची मानसिकता नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर त्या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत आ. अतुल बेनके यांनी पक्ष फुटल्याचे मनस्वी दुःख होत असून, मी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत नसल्याचे म्हटले होते. याबाबत आता ते म्हणाले, आजही माझी मानसिकता तीच असून, मी पुढील विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याच्या मानसिकतेतच आहे. माझे नेते अजित पवार व सहकारी काय सांगतील, त्यावर पुढील निर्णय घेऊ.

हेही वाचा

चित्रपटात काम केलेला 900 किलोचा ‘मोहन’ अवतरला मंडईत

उद्धव ठाकरे आज पनवेलमध्ये; उरण- खोपोलीतही मेळावा

दोन भावंडांना संपवणार्‍या बिहारी बाबूला अटक

Back to top button