अखेर राहुरीत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास..! | पुढारी

अखेर राहुरीत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास..!

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : नगरपरिषदेचा कारभार नव्या मुख्याधिकार्‍यांच्या हाती पडत नाही तोच अतिक्रमण हटाव मोहीम जोर धरते, ही संकल्पना मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनीसुद्धा कायम राखली आहे. पालिकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी दिवसभर शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविल्याने अंतर्गत रस्त्यांनी अखेर मोकळा श्वास घेतल्याचे दिसले. राहुरीतील अंतर्गत रस्त्यावरून प्रवास म्हणजेच संकटातून मार्ग काढण्याचा प्रकार होता. शहरात धनदांडग्या व्यापार्‍यांनी दुकानांचे दरवाजे रस्त्यापर्यंत आणून दुकानाचे साहित्य अगदी रस्त्याच्या जागेत टाकले होते.

शहरात पेठेमध्ये येणार्‍या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांच्या अस्ताव्यस्त पार्कींगने अंतर्गत रस्त्याचा अक्षरशः श्वास कोंडला होता. याबाबत राजकीय नेत्यांसह प्रशासन अधिकार्‍यानी अनेक बैठका घेतल्या. पालिकेचे पुर्वीचे मुख्याधिकारी यांनी शहरात दाखल होताच अतिक्रमण पाहून अनेकदा ते हटाव मोहीम हाती घेतली, परंतू अतिक्रमण हटविल्यानंतर काही कालावधी उलटत नाही तोच राजकीय नेत्यांच्या आशिर्वादाने पुन्हा अतिक्रमणा जैसे- थे अवस्थेत दिसत होते. काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेचा कारभार हाती घेतलेले ज्ञानेश्वर ठोंबरे यांची अतिक्रमणाबाबत नेमकी भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता, परंतू पोलिस प्रशासनाने धडक कारवाईला प्रारंभ केल्यानंतर शहरातील वाहतूक व अतिक्रमणाबाबत नियोजन सुरू झाले.

ठोंबरे यांनी यासाठी पाठबळ देत 8 दिवसांपूर्वी अतिक्रमण काढा, अन्यथा जेसीबीने कारवाई करणार असल्याचा ईशारा दिला होता. अखेर पालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने शहरात सर्वत्र जेसीबी व क्रेनने अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ केल्याचे दिसले. ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख विकास घटकांबळे, गणेश बावडकर, सुनील कुमावत, आप्पासाहेब तनपुरे, हरिश्चंद्र बिवाल, भाऊसाहेब ढोकणे, बाबासाहेब गुंजाळ, राजकुमार खंगले, राजेंद्र गुलदगड, भाऊसाहेब हिंगे, गोरख माळी, दिगंबर शिंदे, धनंजय फुगारे, सहास हराळे, लक्ष्मण भालेराव, अभिनंदन गायकवाड, संतोश डागवाले यांच्या पथकाने शनि चौक, नवी पेठेतील अतिक्रमण काढले.

अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना काही छोट्या व्यापार्‍यांनी स्वतः टपर्‍या, हातगाड्या काढून घेतल्या, परंतू अतिक्रमण काढले नाही त्यांचे अतिक्रमण जेसीबी व क्रेनने हटविण्यात आली. दरम्यान, राहुरीत अनेक छोट्या व्यापार्‍यांची छोटी दुकाने जमीनदोस्त करण्यात आली, परंतू काही मोठ्यांच्या पक्क्या अतिक्रमणांबाबत अजून पालिकेने ठोस निर्णय घेतला नाही. पालिका प्रशासन अतिक्रमण मोहीम सुरूच ठेवणार असल्याने पक्के बांधकामे बाजुला करीत सर्वसामान्यांप्रमाणे धनदांडग्यांवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अतिक्रमण हटावला कुणाचा विरोध नाही, परंतू केवळ सर्वसामान्यांची दुकाने हटविली आहे. धनदांडग्यांनी पालिकेची जागा अडवून पक्की बांधकामे केली. काहींनी रस्त्यापर्यंत दुकाने थाटली. तेही अतिक्रमण हटवावेत, अन्यथा वंचित मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही.

– निलेश जगधने, वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी

अतिक्रमणे काढणारच : मुख्याधिकारी ठोंबरे

राहुरीत पूर्वी काय झाले, यापेक्षा यापुढे काय होणार, हे महत्वाचे आहे. अतिक्रमणाने शहराच्या सौंदर्यात बिघाड होऊन त्याचा त्रास सर्वांना होत होता. यामुळे नगरपरिषदेने शहराला अतिक्रमणमुक्त करण्यास पुढाकार घेतला आहे. सर्व अतिक्रमण काढल्याखेरीज मोहीम थांबणार नसल्याचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button