मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे कायम पलटी मारतात आणि खोटे बोलतात, असा आरोप करत जरांगे यांचे कोअर कमिटीचे सदस्य असलेले अजय बारस्कर महाराज यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
संबंधित बातम्या
मी अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहे. मध्यंतरी अंतरवाली सराटीमध्ये घडलेल्या घटनेनंतर मी आंदोलनाच्या या लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदणीसाठी मी काम केले. त्यामुळेच मी जरांगे यांच्यासोबत सहभागी झालो होतो. मात्र, कधीच माध्यमांसमोर आलो नाही. जरांगेहेकेखोरअसून, ते कायम पलटी मारतात. सतत खोटे बोलतात, अशा आरोपांच्या फैरी बारस्कर यांनी झाडल्या.
मनोज जरांगे यांच्या प्रत्येक कृतीचा मी साक्षीदार आहे. माझ्या मनात अनेक दिवसांपासून खदखद होती. ती मी व्यक्त करत आहे. यामुळे मला गोळ्या घालून मारून टाकू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, ते मी सहन करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
जरांगे यांनी रांजणगाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकार्यांसोबत गुप्त बैठक घेतली होती. त्याचाही मी साक्षीदार आहे. लोणावळा, वाशी येथेही मराठा समाजाला डावलून काही बैठका झाल्या. अशा गुप्त बैठकांना माझा आक्षेप होता. या गुप्त बैठकांचे अनेक पुरावे माझ्याकडे असल्याचा दावादेखील बारस्कर महाराज यांनी केला आहे.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करणारे जरांगे यांच्यावर अनेक आरोप केल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बच्चू कडू यांनी बारस्कर यांना पक्ष संघटनेतून बडतर्फ केले आहे.