Nagar : झेंडीगेट परिसरात कत्तलखान्यावर छापा | पुढारी

Nagar : झेंडीगेट परिसरात कत्तलखान्यावर छापा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  कोतवाली पोलिस ठाण्याच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री झेंडीगेट परिसरातील कत्तलखान्यावर छापा घालून 15 जनावरांची सुटका केली. तर, तीन टेम्पो व सहा किलो मांस असा 20 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज खलील शेख (वय 23, रा. कोठला, नगर), फैजल अस्लम शेख (वय 20, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट, नगर) यांना अटक करण्यात आले आहेत. सलीम शब्बीर कुरेशी, फैजान अब्दुल कुरेशी (रा. झेंडी गेट, नगर) पसार झाले.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, 13 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती मिळाली की, शहरातील झेंडी गेट परिसरातील कारी मशिदीजवळ बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालय जवळ एका बंद खोलीत गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू आहे. तर, काही जनावरे कत्तलीसाठी आणली आहेत. त्यानुसार पोलिस पथकाला छापा घालण्याच्या सूचना दिल्या. रात्रगस्त पोलिस अधिकारी व गुन्हे शोध पथकाच्या कमर्चार्‍यांनी सोमवारी मध्यरात्री झेंडीगेट परिसरातील कारी मशिदीजवळील बंद खोलीवर छापा घातला. तीन मालवाहू टेम्पो, दोन लोखंडी सत्तूर, 12 गोवंशीय जनावरे व 3 म्हैसवर्गीय जनावरे व अंदाजे 600 किलो गोवंशीय जनावराचे मांस असा एकूण 20 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत आरोपी अरबाज शेख, फैजल शेख, सलीम कुरेशी, फैजान कुरेशी यांच्याविरूद्ध पोलिस कॉन्स्टेबल सुरज कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकातील उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल दीपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, सूरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे, महेश पवार, अभय कदम, अमोल गाडे, संकेत धीवर यांच्या पथकाने केली.

कोतवालीत जनावरांची दावण
कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरातील कत्तलखान्यावर छापा घालून 13 गोवंशीय जनावरे व 3 म्हसवर्गीय जनावरांची सुटका केली. ती जनावारे कोतवाली पोलिस ठाण्यात आणण्यात आली. त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन गोशाळेत नेण्यासाठी वेळ असल्याने टेम्पोत जनावरे अवघडून गेली होती. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी टेम्पोतून जनावरे खाली घेत पोलिस ठाण्यासमोर जनावरांची दावण तयार केली. त्यांना चार टाकून पाण्याची सोय करण्यात आली होती.

Back to top button