Nagar : विद्यार्थ्यांनी केले शिक्षिकेचे अनोखे स्वागत | पुढारी

Nagar : विद्यार्थ्यांनी केले शिक्षिकेचे अनोखे स्वागत

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थी अन् शिक्षक यांच्यात सुसंवाद असला की विद्यार्थी शिक्षकांप्रती प्रेम, आपुलकी व्यक्त करतात. शहरातील रजिस्टर मळा येथे कार्यरत असणार्‍या संगीता पवार-गांगर्डे यांच्याबाबतीत असाच काहीसा अनुभव आला आहे. आजारपणामुळे दीड महिना रजेवर असणार्‍या संगीता पवार या उपशिक्षका शाळेत हजर होताच विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या स्वागताने पवार भारावून गेल्या. संगीता पवार या गेल्या पाच वर्षांपासून श्रीगोंदा शहरातील रजिस्टर मळा येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.शिस्तप्रिय, प्रत्येक विद्यार्थ्याच्या शालेय सर्वांगीण विकासासाठी त्यांचे विशेष प्रयत्न असतात अन म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याविषयी एक वेगळाच आदर निर्माण झाला आहे.

शिक्षिका पवार या गेल्या दीड महिन्यापासून आजारी होत्या. परिणामी त्यांना शाळेत हजर राहता आले नाही. आजारपणातून बाहेर पडताच त्या शाळेवर हजर झाल्या. त्या शाळेत हजर होणार असल्याने विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट केली. वर्गातील फळ्यावर शिक्षिका पवार यांच्यावर चार ओळी लिहीत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला. शिक्षिका पवार यांनी शाळेच्या फाटकातून आत प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या अशा अनोख्या स्वागताने शिक्षिका पवार भारावून गेल्या. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जवळ जाऊन त्यांनी त्यांची विचारपूस केली. हा सगळा प्रसंग घडत असताना शिक्षिका पवार यांचे डोळे पाणावले. विद्यार्थी अन् शिक्षकाचे नाते किती जिव्हाळ्याचे असू शकते, हे दिसून आले. एखाद्या शिक्षकाविषयी आदर, आपुलकी असली की विद्यार्थी काय करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

वर्ग सजावटीसाठी हर्षवर्धन पोटे,राजवर्धन पोटे, पृथ्वीराज लोखंडे, सायली शिंदे, जय कवडे, सार्थक लोखंडे, अथर्व पोटे, धीरज घोरपडे या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना स्नेहा पोटे, साक्षी लोखंडे या तरुणींनी मदत केली.

‘खासगी’च्या युगात मोठी स्पर्धा
जिल्हा परिषद शाळासमोर खासगी शाळांचे मोठे आव्हान उभे आहे. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध होत असल्याने, शिक्षक पूर्ण झोकून देऊन काम करत असल्याने, शाळांचा पट आजही टिकून आहे, असे मुख्याध्यापिका तनुजा शिंदे यांनी सांगितले.

Back to top button