कारागिरापर्यंत ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ पोचवा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ | पुढारी

कारागिरापर्यंत ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ पोचवा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

नगर : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह देशाच्या सर्वांगिण विकासामध्ये बारा बलुतेदारांचा मोठा वाटा आहे. बलुतेदारांच्या परंपरागत व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक कारागिरांपर्यंत पोहोचवा. या योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेबाबत परिसंवाद व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, राष्ट्रीय सुकाणू समितीचे सदस्य अ‍ॅड. अभय आगरकर, सचिन पारखे, कौशल्य विभागाचे सहायक संचालक नि. ना. सूर्यवंशी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष नवले, लघु सूक्ष्म उद्योगाचे सहायक संचालक सुनील पुसणारे, बी.आर.मुंडे, आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात 1 हजार 600 पेक्षा अधिक गावे आहेत. प्रत्येक गावांत अनेक पारंपरिक शिल्पकार व कारागीर आहेत. प्रत्येक गावातील शिल्पकार व कारागिरांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व पदाधिकारी व अधिकार्‍यांनी योजनेची अधिक व्यापक स्वरूपात जागृती करावी. योजनेची माहिती प्रत्येक कारागिरापर्यंत पोहोचविण्यात येऊन कारागिरांची योजनेसाठी नोंदणी करून घ्यावी. योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहाणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी या वेळी सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, अभय आगरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील कारागिरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हेही वाचा

Back to top button