तणावाचा त्वचेवरील परिणाम

तणावाचा त्वचेवरील परिणाम

[author title="डॉ. शरीफा चौसे" image="http://"][/author]

वाढती स्पर्धा, कामाचे वाढते तास, बदलती जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे तणाव निर्माण होतो. दीर्घकालीन तणावामुळे केवळ उच्च रक्तदाब किंवा रक्तातील साखरेची पातळी, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकत नाही, तर त्वचेशी संबंधित चिंताजनक समस्यादेखील निर्माण होऊ शकतात.

अतितणाव त्वचेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतो. एक्झिमा, सोरायसिस आणि रोसेसिया, पुरळ येणे, मुरूम येणे, केस गळणे, अलोपेसिया अरेटा, मेलास्मा या विकारांबरोबरच तणावामुळे शरीरातून कॉर्टिसॉल आणि ड्रेनालाईनसारखे काही हार्मोन्स सोडले जातात. यामुळे त्वचा संवेदनशील आणि नाजूक होते. तणाव व्यक्तीवर त्याच्या तीव्रतेनुसार भावनिक, मानसिक किंवा शारीरिक अशा विविध मार्गांनी प्रभाव पाडतो.

तणाव-संबंधित त्वचेच्या समस्यांची कारणे :

मानसिक तणाव हे त्वचेच्या समस्यांचे एक प्राथमिक कारण आहे. कामाचा ताण, आर्थिक समस्या, नातेसंबंधातील दुरावा किंवा जीवनातील इतर बदल यांसारख्या दैनंदिन समस्यांमुळेही तणाव निर्माण होऊ शकतो.

शरीरातील हार्मोनल बदल : एखाद्या व्यक्तीच्या शरीरात वारंवार होणारे हार्मोनल बदल त्वचेशी संबंधित समस्यांना कारणीभूत ठरू शकतात आणि ते एखाद्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. हार्मोनल पातळीतील चढ-उतार, विशेषत: गर्भधारणेदरम्यान, रजोनिवृत्ती आणि पौगंडावस्थेत तुमच्या त्वचेवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे ती संवेदनशील बनते.

लक्षणे कोणती?

काळी वर्तुळे : काळी वर्तुळे ही विविध व्यक्तींनी अनुभवलेल्या तणावाची सामान्य लक्षणे आहेत. उशिरापर्यंत जागे राहणे, मद्यपान करणे आणि धूम्रपान करणे यांसारख्या जीवनशैलीच्या विविध सवयींमुळे काळी वर्तुळे उद्भवू शकतात, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण आणि डोळ्यांभोवतीच्या कोलेजनवर परिणाम होऊन ते थकल्यासारखे आणि निस्तेज दिसतात.

नखं खाणे : दीर्घकालीन तणाव असलेल्या लोकांना अस्वस्थ वाटते किंवा त्यांची नखे खाण्याची सतत इच्छा होते. त्यावर नियंत्रण न ठेवल्यास नखांना संसर्ग किंवा नुकसान यांसारख्या विविध समस्या उद्भवू शकतात.

केस गळणे : दीर्घकाळ तणावामुळे केस गळणे आणि केस पातळ होऊ शकतात. एखाद्याला अचानक केस विंचरताना, केस धुताना, उशीच्या कव्हरवर बरेच केस दिसू शकतात आणि टक्कल पडायला सुरुवात होते.

त्वचेचा कोरडेपणा : तणावामुळे तुमची त्वचा कोरडी पडते आणि त्वचेची आर्द्रता कमी होऊ शकते. विशेषत: प्रदूषित वातावरणात तुमची त्वचा घट्ट, खडबडीत होते.

त्वचेवरील ताणाच्या इतर सामान्य लक्षणांमध्ये त्वचारोगाचा समावेश होतो, ज्यात त्वचेला सूज आणि जळजळ, अंगावर उठणार्‍या पित्ताच्या गाठी आणि लालसरपणा, जळजळ, खाज येणे आणि सुरकुत्या पडणे तसेच कोरडी त्वचा ज्यासाठी वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

उपचार

तणाव कमी करण्यासाठी नृत्य, कार्डिओ, योगा आणि श्वासोच्छ्वासाचे व्यायाम यांसारख्या क्रियांची निवड करा. सततच्या तणावामुळे त्वचा निस्तेज आणि थकल्यासारखी दिसू शकते. त्यामुळे त्वचेची योग्य निगा राखणे, आपल्या त्वचेचे योग्य पोषण करणे महत्त्वाचे आहे. त्वचेवर रासायनिक उत्पादनांचा वापर टाळणे गरजेचे आहे. रासायनिक उत्पादनांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्वचेवर कोणतीही नवीन उत्पादने वापरण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

प्रतिबंधात्मक उपाय

निरोगी शरीर आणि मन तणावापासून दूर राहण्यास आणि त्वचा तजेलदार करण्यास मदत करते. निरोगी त्वचेकरिता नियमित कार्डिओ किंवा योगसाधना करा, संतुलित आहार घ्या, आहारात भरपूर ताजी फळे, भाज्या आणि मसूरचा वापर करा आणि किमान 8 तास झोप घ्या. सतत काम किंवा वैयक्तिक जबाबदार्‍यांमुळे थकवा जाणवू शकतो. मसाज किंवा हेअर स्पासारख्या पर्यायांची निवड करून स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या. मन आणि शरीर ताजेतवाने राहण्यासाठी, शरीराला आवश्यक विश्रांती देण्यासाठी ठरावीक अंतराने छोटे ब्रेक घ्यायला विसरू नका. वेळात वेळ काढून मिनी व्हॅकेशनसाठी जा. जेणेकरून तणावमुक्त राहता येईल.

पुरेसे पाणी प्यावे, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासदेखील उपयुक्त आहे. तज्ञांच्या सल्ल्याने तणावाचे व्यवस्थापन करा आणि निरोगी जीवनशैली जगा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news