

वॉशिंग्टन : जगाच्या पाठीवर अनेक अनोख्या वनस्पतीही पाहायला मिळतात. त्यामध्ये कीटकभक्षण करणार्या घटपर्णीसारख्या, मादागास्करमधील पाणी साठवून ठेवणार्या बाओबाब वृक्षासारख्या तसेच येमेनच्या रक्तासारखा लाल द्रव उत्सर्जित करणार्या 'ड्रॅगन ब्लड ट्री' या वृक्षांचाही समावेश होतो. आता एका फोटोग्राफरने चक्क घुबडासारखे रूप असलेल्या वनस्पतीला समोर आणले आहे. जागतिक छायाचित्र स्पर्धेत या वनस्पतीच्या फोटोला पुरस्कारही मिळाला आहे.
वर्ल्ड नेचर फोटोग्राफी अॅवॉर्डस्मध्ये या फोटोचा समावेश होता. ही वनस्पती जमिनीलगत वाढते व तिचा रंग पाचूसारखा सुंदर हिरवा असतो. फोटोग्राफर चॅट्री लेर्टसइंटॅनाकोर्न यांनी हे छायाचित्र थायलंडमध्ये टिपले आहे. एका मोठ्या झाडाखाली जमिनीतून डोकावून बाहेर येत असलेली ही वनस्पती पाहून त्यांनी ती आपल्या कॅमेर्यात टिपून घेतली.
या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव 'थिस्मिया थायथोंगियाना' असे आहे. ही एक मायको-हेटरोट्रॉफिक प्रजाती आहे. अर्थात, ही वनस्पती अन्य वनस्पतींप्रमाणे प्रकाशसंश्लेषणाच्या क्रियेने अन्ननिर्मिती करीत नाही, तर ती बुरशीतून स्वतःला हवी असलेली ऊर्जा व पोषक द्रव्ये मिळवते. झाडांच्या मुळाजवळ ज्या बुरशी असतात त्यांच्या आधारावर ही वनस्पती वाढते. थायलंडच्या दोई हुआ मोत पर्वतामध्ये 2018 मध्ये संशोधकांनी या वनस्पतीचा शोध लावला होता.