Crime news : जेलची प्रतिकृती असलेला केक तलवारीने कापला | पुढारी

Crime news : जेलची प्रतिकृती असलेला केक तलवारीने कापला

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मोक्का गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असताना त्याच्या साथीदारांनी आरोपीच्या वाढदिवसानिमित्त केकवर त्याचा फोटो लावून व येरवडा कारागृहाची प्रतिकृती असलेला केक बनवला. नंतर तो केक तलवारीने कापून वाढदिवस साजरा करून दहशत पसरविल्या प्रकरणी हे कृत्य करणार्‍यांच्या चतुःश्रृंगी पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
ओम ऊर्फ सोनू ज्ञानेश्वर बुरूड (वय 19), अनिकेत ऊर्फ मन्या अशोक कातुर्डे (वय 19), अनिकेत दुर्गेश धोत्रे (वय 20), सागर रामचंद्र खताळ (वय 25, चौघेही रा.जनता वसाहत, जनवाडी) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

तसेच, त्यांच्या अन्य अल्पवयीन साथीदारांसह इतरांवरीही गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस हवालदार श्रीधर विश्वास शिर्के (वय 44) यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित आरोपींचा साथीदार शुभम प्रदीप शिरकर हा कोयत्याने दहशत पसरविल्याच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात बंदिस्त आहे. काही मुले सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून तलवारीने येरवडा कारागृहाची प्रतिकृती असलेला व शिरकरचा फोटो असलेला केक कापत असल्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तसेच, हातामध्ये तलवारी घेऊन दहशत निर्माण केली होती. त्यामुळे चतुःश्रृंगी पोलिसांनी चौघांना दहशत पसरविल्याप्रकरणी व हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button