नगर दक्षिणेतून लोकसभा लढणार : राणी नीलेश लंके | पुढारी

नगर दक्षिणेतून लोकसभा लढणार : राणी नीलेश लंके

पाथर्डी : पुढारी वृत्तसेवा :  लोकसभेच्या आगामी निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून आपण उमेदवारी करणार असून, आपल्या विरोधात कोणताही उमेदवार असला तरी आपल्याला काही फरक पडत नाही. आपण ही निवडणूक लढवणारच,असा निर्धार माजी जि. प. सदस्या राणी लंके यांनी केला. तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवी येथून शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.त्यावेळी लंके बोलत होत्या. आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य घराघरांत पोहोचविण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा सुरु करण्यात आली. नगर दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक गावात ही यात्रा जाणार आहे. त्याचा प्रारंभ बुधवारी श्री क्षेत्र मोहटादेवी गडावरून करण्यात आला. नीलेश लंके प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष कारभारी पोटघन, दौलत गांगड, विपुल सावंत, उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रफिक शेख, माजी नगरसेवक चांद मनियार, अर्जुन धायतडक, महादेव दहिफळे ,महेश दौंड, उबेद आतार, दीपक मासाळकर, आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड आदी उपस्थित होते.

पाथर्डी येथे पत्रकारांशी बोलताना लंके म्हणाल्या, नगर दक्षिणेतील प्रत्येक गावात ही यात्रा जाणार असून, प्रत्येक गावात शिवव्याख्याते शिवाजी महाराजांचे कार्य लोकासमोर पोहोचविणार आहेत. पंधरा दिवस ही यात्रा चालणार आहे.15 जानेवारी रोजी शिवस्वराज्य यात्रेचा समारोप नगर शहरात आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत होणार आहे. लंके प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष कारभारी पोटघन म्हणाले, पंधरा दिवस ही यात्रा नगर दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक गावात जाणार असून,यात्रेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे कार्य समाजासमोर नेण्यात येणार आहे. आचारसंहिता लागली नाही, तर संपूर्ण नगर जिल्ह्यात ही यात्रा नेणार आहोत. आमदार नीलेश लंके किंवा राणीताई लंके हे लोकसभा निवडणूक लढविणार आहेत, हे निश्चित झाले आहे. सूत्रसंचालन चांद मनियार यांनी तर महादेव दहिफळे यांनी आभार मानले.

Back to top button