Nagar : मढीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करा ; ग्रामसभेत ठराव | पुढारी

Nagar : मढीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करा ; ग्रामसभेत ठराव

मढी : पुढारी वृत्तसेवा :  कानिफनाथ देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी मंदिरासमोरच शिवीगाळ करीत हाणामारी केल्याने ग्रामस्थ व नाथभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे देवस्थानचे विश्वस्तमंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करा, असा ठराव मढी येथे बुधवारी झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला. यावेळी विश्वस्त मंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली.
देवस्थानचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड, माजी अध्यक्ष सचिन मरकड, माजी विश्वस्त उत्तम मरकड, दीपक साळवे,फिरोज शेख, परसराम मरकड आदी ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेतला.

सचिन मरकड म्हणाले, विश्वस्तांच्या हाणामारीमुळे न्यास व मरकड कुटुंबीयांची मोठी बदनामी झाली असून, भाविक व ग्रामस्थांमध्ये संताप आहे. सध्या कार्यरत असलेल्या विश्वस्त मंडळाने केलेल्या गैरकारभाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोषी विश्वस्तांवर गुन्हे दाखल होणार आहेत. विश्वस्तांच्या वादामुळे भाविकांना पुरविण्यात येणार्‍या सेवा सुविधा व दैनंदिन पूजाअर्चा, धार्मिक कार्यक्रम, अन्नछत्रालय, लाडू प्रसाद, दळणवळण आदी सुविधांवर दूरगामी परिणाम झाले आहेत. अध्यक्षपदासाठी हाणामार्‍या करणार्‍या विश्वस्तांना देवस्थानचा कारभार पाहण्याचा अधिकार नाही. ग्रामसभेचा ठराव घेऊन तत्काळ नगर व पुणे धर्मादाय आयुक्तांना देण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसांत संबंधितांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांना घेऊन नगर येथील धर्मादय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती सचिन मरकड यांनी यावेळी दिली.

याबाबत देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड म्हणाले, मी मढी गावचा सरपंच व देवस्थानचा अध्यक्ष आहे. दानपेटीमधील पैशांची काहींनी अफरातफर केली आहे. त्यांचा गैरव्यवहार आपण उघड करू, या भीतीने माझ्यावर जीवघेणा हल्ला करून मला संपविण्याचा प्रयत्न होता. भाविक व ग्रामस्थांसाठी कासार पिंपळगाव ते मढीपर्यंतच्या पाणीयोजनेस स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याचा आरोप संजय मरकड यांनी ग्रामसभेत केला.

अनेक घटनाबाह्य निर्णयामुळे विश्वस्त मंडळ वादाच्या भोवर्‍यात सापडले असून, सध्या देवस्थान ट्रस्टचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यावर ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन तोडगा काढण्याचे आवाहन मरकड यांनी केले. विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणुकीची सूचना सचिन मरकड यांनी मांडली. त्यास दीपक साळवे यांनी अनुमोदन दिले.

मढी गावामधून अकरा विश्वस्त नेमा
नाथपूजा विधीचा मान सुरुवातीपासूनच मरकड कुटुंबीयांना आहे. विश्वस्तांनी घटनेत बदल करून मरकड कुटुंबातील सहा व इतर पाच विश्वस्त मढी गावातील घेतले पाहिजेत, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली.

Back to top button