नगर जिल्हा डेंग्यू तापाने फणफणला ; 29 दिवसांत आढळले 62 रुग्ण | पुढारी

नगर जिल्हा डेंग्यू तापाने फणफणला ; 29 दिवसांत आढळले 62 रुग्ण

नगर : पुढारी वृत्तसेवा :  ग्रामपंचायतींना कोरडा दिवस पाळण्याचा पडलेला विसर, आरोग्य प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष आणि नागरिकांचा निष्काळजीपणा, यामुळे जिल्ह्यात डेंग्यूचे थैमान सुरू झाले आहे. गेल्या 29 दिवसांत डेंग्यूचे 62 रुग्ण आढळले असून, सोनई आणि वडारवाडी शिवारात दोन संशयित मृत्यूही झाले आहेत. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत डेंग्यू बाधितांचा आकडा 162 वर पोहोचला आहे. थंडीतापाचे रुग्णही वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखान्यांतही ओपीडी फुल दिसत आहेत. आरोग्य विभागाकडून डेंग्यूच्या तापाबाबत जनजागृती केली जाते. ग्रामपंचायतींसह प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांतूनही डेंग्यू प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. मात्र, तरीही काही ठिकाणी डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती होऊन तेथे रुग्ण आढळून येत आहेत.

डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती
डेंग्यूचे डास साठलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. एसी, फ्रीजखाली साचणारे पाणी, घराच्या खिडक्यांना जाळी नसणे, फुलदाण्या, कुलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर यामध्ये साचणार्‍या पाण्यातही या डासांची निर्मिती होत असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे.

डेंग्यूची लक्षणे
डास चावल्यानंतर चार ते दहा दिवसांनंतर ही लक्षणे आढळून येत असल्याचे सांगितले जाते. अचानक थंडी वाजून येणे, डोकेदुखी, अंगदुखी, हाडे दुखणे, सांध्यांमध्ये वेदना होणे, मळमळ होणे, अंगावर सूज येणे, पुरळ येणे, चट्टे येणे, तसेच रक्तस्त्राव इत्यादी.

सोनई, वडारवाडी, केडगावात संशयित मृत्यू
ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे 62 रुग्ण आढळले आहेत. सोनई, वडारवाडी, केडगाव या ठिकाणी तिघांचा मृत्यू डेंग्यूने झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र आरोग्य प्रशासनाने याचा इन्कार केला असून, याबाबतचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.

खासगी हॉस्पिटलने माहिती दडविली
ज्या ठिकाणी डेंग्यूचा रुग्ण आढळला, त्या ठिकाणी फॉगिंगसह अन्य उपाययोजना हाती घेतल्या जातात. मात्र वडारवाडी येथील संबंधित रुग्णावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याची माहिती जिल्हा हिवताप विभागाला देणे बंधनकारक होते. मात्र थेट रुग्णाच्या मृत्यूनंतरच बाधित रुग्णाची माहिती समजली, असे जिल्हा हिवताप विभागातून सांगण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात तापाचे 337 रुग्ण
जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि. 30) दुपारपर्यंत 900 पेक्षा जास्त ओपीडी झाली होती. यामध्ये 337 रुग्ण सर्दी, तापाने फणफणल्याने उपचारासाठी आले होते. यात 123 महिला तर 214 पुरुष होते. तसेच अ‍ॅडमिट रुग्णांमध्ये बालकांची संख्याही मोठी असल्याचे दिसले.

केडगावचे 79 नमुने
तपासणीसाठी रवाना
केडगाव येथील एकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने त्या परिसरातील 79 जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यांची जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत तपासणी केली जात आहे. तसेच त्या भागात उपाययोजना राबविल्या जात आहेत.

आरोग्य केंद्रातून कोणती अंमलबजावणी?
प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज बाह्य रुग्ण विभागात तपासणी सुरू असते. यामध्ये 10 पेक्षा अधिक रुग्ण एकाच भागातील असल्याचे निदर्शनास आल्यास तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी याबाबतची माहिती हिवताप अधिकार्‍यांना देणे गरजेचे आहे. तसेच आरोग्य केंद्रात एचएलएल अंतर्गत रक्त तपासणी करणे अपेक्षित आहे. मात्र यातील किती ठिकाणी अंमलबजावणी केली जाते, हा संशोधनाचा भाग आहे.

ग्रामपंचायतींनी आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळलाच पाहिजे, आम्ही त्या संदर्भात तसा पत्रव्यवहार केलेला आहे. नागरिकांनीही आपल्या घरात, परिसरात डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे.
                                                           – एन. कंठे, जिल्हा हिवताप अधिकारी

Back to top button