कापसाला अवघा 6 हजारांचा दर | पुढारी

कापसाला अवघा 6 हजारांचा दर

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुक्यात व्यापार्‍यांनी कापूस खरेदीला प्रारंभ केला आहे. दरम्यान, शेतकर्‍यांच्या पांढर्‍या सोन्याला मागील वर्षापेक्षाही कमी दर लाभत असल्याने शेतकर्‍यांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. अधिक दर मिळेल, या आशेने साठवणूक केलेल्या कापसाला अत्यल्प दर लाभल्याने शेतकर्‍यांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्याचे चित्र आहे. शेतकर्‍यांसाठभ पांढरे सोने समजल्या जाणार्‍या कापूस पिकाची खरेदी सुरू झालेली आहे. राहुरी शहरासह ग्रामिण पट्यामध्ये अनेक व्यापार्‍यांनी काटे उभारत कापूस खरेदी सुरू केली आहे. पांढर्‍या शुभ्र कापसाला सर्वाधिक 6 हजार 300 रुपयांचा दर दिला जात आहे.

संबंधित बातम्या :

मागील वर्षीही शेतकर्‍यांच्या कापसाला 10 हजार रूपयांचा उच्चांकी दर लाभेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. परंतु शेतकर्‍यांना केवळ 7 ते 9 हजारांचा दर मिळाल्याने शेतकर्‍यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यामुळे राहुरी तालुका हद्दीमध्ये मोठ्य प्रमाणात कापूस उत्पादन झाल्यचे दिसून आले. शेतकर्‍यांनी महागडी बीयाणे, औषधे, खते, मशागतीचा खर्च केला. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही पावसाने निराशा केली. मान्सून हंगामाने नाराज केल्याने सर्वाधिक फटका कापूस पिकाला बसला. पाऊस वेळेत न झाल्याने कापूस पिकाने माना खाली घातल्या होत्या. कापूस पीके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांनी जीवाचा अटापिटा केला. कसेबसे कापूस उत्पादित केल्यानंतर निम्याने कापूस उत्पादन क्षमता घटल्याचे दिसून आले.

शेतकर्‍यांना अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक शेतकर्‍यांनी यंदाच्या वर्षी अधिक दर मिळेल, या अपेक्षेने कापूस साठवणूक करून ठेवली होती. परंतु यंदाही कापूस पिकाच्या दराने शेतकर्‍यांच्या अपेक्षाभंग केल्याचे दिसून आले आहे. चालू वर्षी राहुरी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना केवळ 6 हजाराच्या समीप दर मिळत आहे.

यंदाच्या हंगामात एकीकडे निसर्गाच्या अवकृपेने उत्पादन घटले तर दुसरीकडे व्यापार्‍यांकडून मिळालेले कमी दर पाहता शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. पांढर्‍या सोन्याचे दर काळवंडले असताना चोरट्यांनी राहुरी परिसरात धुडगूस घातल्याचे दिसत आहे. राहुरी हद्दीत यंदा कापसाचे क्षेत्र चांगलेच वाढलेले आहे. कापूस पीकाच्या माध्यमातून दोन पैसे पदरात पडेल, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी कापूस पीक उत्पादित केले. परंतु शेतकर्‍यांच्या बांधावर जात चोरट्यांनी कापूस पिकाला लक्ष केले आहे. शेतकर्‍यांचा कापूस पीक चोरीला जात असल्याने शेतकर्‍यांना मिळेल ते दर पदरात पाडून आपले पांढरे सोने व्यापार्‍याच्या दारी न्यावे लागत आहे. शेतकरी सर्वच बाजुने संकटात सापडला आहे.

चोहोबाजुने कापूस उत्पादित केलेल्या शेतकर्‍याला लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. कवडीमोल दराने कापूस पीक विकण्याची वेळ आल्यास शेतकर्‍यांना अजून कर्जबाजारी व्हावे लागेल, असे नाराजीने उत्पादक शेतकरी बोलू लागले आहेत.

कापूस मिल सुरू झाल्यानंतर दर वाढेल
राहुरीत कापूस खरेदी सुरू झाली आहे. मार्केटप्रमाणे शेतकर्‍यांना 6 हजार 300 ते 6 हजार 500 रुपये असा सर्वाधिक दर लाभत आहे. दसर्‍यानंतर देशातील कापूस मील सुरू झाल्यानंतर कापसाला अजून दर लाभेल, अशी अपेक्षा आहे, अशी माहिती जयहिंद उद्योग समुहाचे अतुल तनपुरेंनी दिली.

Back to top button