एक्झिट पोलकडे पाहत नाही, माझा विजय निश्चित : नारायण राणे

एक्झिट पोलकडे पाहत नाही, माझा विजय निश्चित : नारायण राणे

कुडाळ: पुढारी वृत्तसेवा: मी मागील पाच-पन्नास वर्षे राजकारणात घालवली. आमचे पण काही अंदाज आहेत. आम्ही पण निवडणूक लढवली आहे. आम्ही निवडणुकीत नामधारी नाही, तर सक्रिय होतो, त्यामुळे एक्झिट पोलकडे मी पाहत नाही, माझा विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली.

कुडाळ येथील गुलमोहर हाॅल येथे पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची आढावा बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीनंतर ना.राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या विजयासाठी आपण सर्वांनी कामाला लागावे. केंद्रात व राज्यात आपली सत्ता आहे, त्यामुळे लोकसभेपाठोपाठ पदवीधर मतदार संघातही आपला विजय निश्चित होईल, असा विश्वासही यावेळी ना. राणे यांनी व्यक्त केला.

कुडाळ येथील गुलमोहर हॉल येथे आज (दि.१) पदवीधर मतदार संघ निवडणूक आढाव्याची बैठक संपन्न झाली. या बैठकीत ना. नारायण राणे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आ. नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, सुरेश गवस, श्वेता कोरगांवकर, रणजित देसाई, वर्षा कुडाळकर आदी उपस्थित होते.

यावेळी ना. राणे म्हणाले की, पदवीधर मतदार संघांची निवडणूक काहीशी वेगळी आहे, पण महायुतीच्या आपल्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. त्यासाठी कोणत्याही ज्योतीषाची आवश्यकता नाही. सर्वांनी सलोख्याने काम करा, असे आवाहन राणे यांनी केले.

मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, आपल्या कोकण पदवीधर मतदार संघामधील पाच जिल्ह्यांत आपले मतदार आहेत. या मतदार संघात 2 लाख 30 हजार मतांची नोंदणी होणे अपेक्षित आहे. नोंदवलेले मतदार शोधून काढणे, ही आपली सर्वांची परीक्षा आहे. त्यामुळे पदवीधर निवडणूक सर्वांनी गंभीरपणे घेणे आवश्यक आहे.

ठिकठिकाणी मतदारांचे मेळावे घेऊन मतदान कसं करावं? हे मतदारांना सांगणं आवश्यक आहे. महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मतपत्रिकेवर सिंगल लाईन करून मतदान करणे आवश्यक आहे.

आ. नितेश राणे म्हणाले की, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत निरंजन डावखरे यांना चांगले मतदान झाले पाहिजे. त्यादृष्टीने काम करा. आता आपल्याला कुठं थांबायचं नाही, हे लक्षात ठेवा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी संजय आंग्रे, अबिद नाईक, अशोक दळवी यांनीही मार्गदर्शन केले. प्रमोद रावराणे यांनी पदवीधर मतदार संघांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रास्ताविक केले. निवेदन रणजित देसाई यांनी करून आभार मानले.

राजन तेली व निलेश राणे अनुपस्थित

कोकण पदवीधर मतदार संघाच्या आढावा बैठकीत मतदार संघाचा परिपूर्ण आढावा घेण्यात आला. तसेच लोकसभेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत जी कामगिरी केली. त्या कामगिरीचे केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कौतुक करत विजयाच्या आनंदात सहभागी व्हा, असे आवाहन केले. या बैठकीत मात्र माजी आमदार राजन तेली व प्रदेश सचिव निलेश राणे यांची मात्र अनुपस्थिती होती.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news