विकासात पाचपुतेंंचे मोठे योगदान : खासदार डॉ. सुजय विखे | पुढारी

विकासात पाचपुतेंंचे मोठे योगदान : खासदार डॉ. सुजय विखे

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी कार्यकर्त्यांच्या जीवावर सर्व संकटांवर मात करीत श्रीगोंदा तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
काष्टी येथे आमदार पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार खासदार विखे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय वयोश्री योजना आणि दिव्यांग साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी खासदार विखे म्हणाले, नगर जिल्ह्याच्या विकासाच्या आराखड्यात ज्या चार-पाच जणांनी योगदान दिले, त्यामध्ये पाचपुते यांचे नाव पुढे येते. आमदार पाचपुते यांनी अनेकांना मोठे केले. त्यांनी प्रामुख्याने काष्टी-जामखेड रस्त्याचे काम केले. हा रस्ता जवळपास पूर्ण होत असून, एका तासात या रस्त्याने आता जाता येईल. लिंपणगाव रेल्वेगेटवरील उड्डाणपुलासाठी 60 कोटी रुपये मंजूर केले. येत्या 15 दिवसांत या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ होईल. तालुक्याचा विकास हा आश्वासनांचा नसून डोळ्याने दिसणारा असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील वयोश्री योजना आणि दिव्यांग साहित्य वाटप करीत आमदार पाचपुते यांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला. पीक पाहणीसाठी कालावधी थोडा राहिला असून, या योजनेत कोणताच शेतकरी मागे राहू नये, यासाठी येत्या दहा दिवसांत तालुक्यातील राहिलेल्या शेतकर्‍यांची पीक पाहणी करून घ्यावी, असे खासदार विखे म्हणाले. आम्ही आमदार बबनराव पाचपुते यांच्याबरोबर आहोत. काही झाले तरी पाचपुते यांच्या खांद्याला खांदा लावून विखे कुटुंब उभे राहील, असे त्यांनी सांगितले.
भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय समाजकल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना आधार देऊन त्यांचा स्वाभिमान वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी संपूर्ण भारतात निःशुल्क साहित्य वाटप करण्यात येत आहे.

यावेळी नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर, डॉ. प्रतिभा पाचपुते, भगवानराव पाचपुते, गौरी शुगरचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे, अरूण पाचपुते, बाळासाहेब महाडिक, मिलिंद दरेकर, सिद्धेश्वर देशमुख, सचिन कातोरे, गणेश झिटे, जिजाबापू शिंदे, बापूसाहेब गोरे, संग्राम घोडके, अशोक खेंडके, सुनील वाळके, शहाजी खेतमाळीस, महेश दरेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

गडचिरोली : वाघिणीच्या हल्ल्यात महिला ठार

एक लाख दावे निकाली काढून पुणे पुन्हा अव्वल

Back to top button