शेवगाव : फुगवटा क्षेत्रावरील पिके धोक्यात! जायकवाडी धरण तळ गाठण्याच्या मार्गावर | पुढारी

शेवगाव : फुगवटा क्षेत्रावरील पिके धोक्यात! जायकवाडी धरण तळ गाठण्याच्या मार्गावर

रमेश चौधरी

शेवगाव(अहमदनगर) : जायकवाडी धरणाच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे शासनाने आता पाण्याचे नियोजन हाती घेतले असून, शेती सिंचनास एक आवर्तन दिल्यानंतर उर्वरित पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाणार आहे. धरणात 33 टक्के पाणीसाठा राहिला आहे. सन 2018 नंतर यावर्षी उद्भवलेली पाण्याची परिस्थिती चिंताग्रस्त आहे. जायकवाडी पाणी फुगवटा क्षेत्रावर अवलंबून असलेली पिके धोक्यात आल्याने, बळीराजा धो धो पावसाचा धावा करीत आहे.

शेवगाव नेवाशासह छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, गंगापूर, पैठण आदी भागाला तारणार्‍या जायकवाडी धरणाच्या पाण्याची परिस्थिती यंदा जीवाला घोर लावणारी झाली आहे. तीन महिने झाले तरी पावसाअभावी धरणात आवक झालेली नाही. उलट जावक होण्याचे प्रमाण वाढल्याने धरणात अवघा 33. 32 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. सध्या जलाशयाची 1506.90 फूट म्हणजे 459.303 मीटर पाणीपातळी आहे. एकूण 1461.355 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून, 723.249 दशलक्ष घनमीटर जिंवत पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या दिवशी 2136.309 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा म्हणजे 98.40 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. त्यामुळे धरणाचे काही वक्र दरवाजे उघडण्यात आले होते.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत फक्त 155 मिलीमीटर पाऊस झाला असून, पावसामुळे नदी, नाल्यांनी धरणात आलेल्या पाण्याचा काही दिवसातच उपसा झाला. मात्र, जून महिन्यात नांदूर मधमेश्वर येथून 239.478 दशलक्ष घनमीटर म्हणजे 8.45 टीएमसी पाणी जायकवाडीत आल्याने, त्यावेळी 26 टक्क्यांपर्यंत खाली गेलेला धरणाचा पाणीसाठा वाढला गेला. आता औद्यौगिक, घरगुती 0.290 दशलक्ष घनमीटर, तर बॅक वॉटर 0.434 दशलक्ष घनमीटर पाणी उपसा होत असून, 1 सप्टेंबरला डाव्या कालव्यातून शेती सिंचनास पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. मागणी आल्यास उजव्या कालव्यातून पाणी देण्यात येणार असून, उर्वरित पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

धरणात 33 टक्क्यांपेक्षा पुढे पाणीसाठा असल्यास जलसंपदा विभाग पाण्याचे नियोजन करते व 33 टक्क्यापेक्षा कमी पाणीस्थिती उद्भवल्यास हे नियोजन शासनामार्फत केले जाते. जायकवाडीचा सध्याचा पाणीसाठा पाहता आता शासनाकडून पाण्याचे नियोजन गेले आहे. याबाबत 26 ऑगस्टला रोहयो मंत्री संदिपान भुमरे, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार प्रशांत बंब, मुख्य अभियंता जयंत गवळी, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांच्या उपस्थितीत पाणी नियोजन बैठक झाली.

यावेळी पिण्यासाठी राखीव पाणी ठेवून उर्वरित पाणी शेती सिंचनास देण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती आहे. धरण अभियंता विजय काकडे, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अभियंता ज्ञानदेव शिरसाठ, धरण सहाय्यक गणेश खराडकर हे पाण्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, तीन महिने होत आले तरी अद्याप धो धो पाऊस झाला नसल्याने, जायकवाडी धरणाची परिस्थिती चिंताग्रस्त झाली आहे. त्याबरोबर शेती सिंचनही धोक्यात आल्याने शेतकरी गडबडला आहे. पुढील दोन महिन्यांत मोठे पाऊस होऊन रब्बीला साथ आणि धरणातील पाण्यावर मात करण्याचा धावा शेतकर्‍यांकडून केला जात आहे.

धरण 49 वर्षांत 12 वेळाच भरले

सन 1974 पासून म्हणजे 49 वर्षांच्या काळात 1990, 1994, 1998, 1999, 2005, 2006, 2007, 2017, 2019, 2020, 2021, 2022 असे 12 वर्षे धरण पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरले होते. सन 1983, 1984, 1988, 1989, 1991, 2004, 2016 मध्ये धरण भरण्याच्या मार्गावर होते. तर, 1985 ते 1987, 1992 ते 1996, 2001 ते 2003, 2009, 2012 ते 2015 व 2018 मध्ये धरण साठा 50 टक्क्यांपेक्षा कमी होता. पैकी 1986 मध्ये 18.91 टक्के, 1995 मध्ये 16.56 टक्के, 2012 मध्ये 10.03 टक्के एवढाच पाणीसाठा राहिला होता.

मेअखेर 10 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन

उन्हामुळे दररोज 0.775 मिलीमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. जूनपासून आजतागायत 20.058 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. गतवर्षी 1 जून 2022 ते 31 मे 2023 मध्ये 275.353 दशलक्ष घनमीटर म्हणजे 10 टीएमसी पाण्याचे उन्हामुळे बाष्पीभवन झाले होते.

हेही वाचा

जगातील सर्वात सुंदर घोडा

शिवगंगा खोर्‍यात विजेचा लपंडाव

उपवासाचा अल्झायमर्स रुग्णांना होतो लाभ, जाणून घ्या कसे?

Back to top button