Jayakwadi Dam : मुळा-भंडारदर्‍यावर पुन्हा जायकवाडीची वक्रदृष्टी; नगर-नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्याची नामुष्की | पुढारी

Jayakwadi Dam : मुळा-भंडारदर्‍यावर पुन्हा जायकवाडीची वक्रदृष्टी; नगर-नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्याची नामुष्की

दीपक रोकडे

अहमदनगर : पावसाने दडी मारली असली, तरी ऑगस्टच्या मध्यापर्यंत घाटमाथ्यावर पडलेल्या पावसाने नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणे जवळजवळ भरली आहेत. त्यामुळे लाभार्थी शेतकरी आणि पिण्यासाठी पाणी वापरणारी शहरे निश्चिंत झाली असतील. पण त्यांचे समाधान जास्त काळ टिकणारे नाही. कारण मराठवाड्यातील अवाढव्य पोट असलेल्या जायकवाडी धरणात नगर-नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्याची नामुष्की पुन्हा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार तशी मागणीही होऊ लागली आहे.

जायकवाडीत सध्या 26 टीएमसी म्हणजे 34 टक्के पाणी आहे. 15 ऑक्टोबरला असलेल्या धरणसाठ्याप्रमाणे समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार पाणी सोडणे गेले, तर नगर-नाशिकमधील पीक नियोजनावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. नगर आणि नाशिक जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत घाटमाथा परिसर वगळता 73 ते 162 मिलिमीटर असा सरासरीने 150 मिलिमीटरच्या आसपास पाऊस झाला आहे. तो केवळ तीस ते पस्तीस टक्क्यांच्या दरम्यान आहे. घाटमाथ्यावरील पावसामुळे भंडारदरा, निळवंडे, दारणा, गंगापूर, मुकणे ही धरणे जवळपास भरली आणि मुळा व पालखेड समुहातील करंजवण ही धरणे समाधानकारक स्थितीत आहेत.

पण कुकडी प्रकल्पातील माणिकडोह (55 टक्के) व घोड (39 टक्के) या धरणांची स्थिती मात्र समाधानकारक नाही. शिवाय दक्षिण नगरमधील मध्यम प्रकल्पसाठेही केवळ 7 ते 28 टक्केच आहेत. त्यातच जायकवाडी धरणाचा जिवंत साठा 26 टीएमसी (34 टक्के) व उजनीचा जिवंत साठा 7 टीएमसी (13 टक्के) असल्याने वरील भागातील धरणातून पाणी जायकवाडी आणि उजनीला सोडण्याचे संकट घोंगावत आहे.

पावसाळ्याचा निम्याहून अधिक कालखंड संपलेला आहे. सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आजच निर्माण झाली आहे. परतीच्या मान्सूनचा पाऊस नगर-नाशिकपर्यंत हमखास पोहचेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे या वर्षी नगर व नाशिक व इतर सर्व पर्जन्यछायेच्या भागातील परिस्थिती चिंताजनक असेल अशी चिन्हे दिसत आहेत. परिणामी रब्बीवरही संकट निर्माण झाले आहे. त्यातच ‘समन्यायी’चे संकट उभे ठाकल्याने नगर-नाशिकच्या धरणांतील पाणी लाभार्थींना पुढील उन्हाळ्यापर्यंत पुरणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

2012 पासून पाच वेळा सोडले पाणी

2005 मध्ये अस्तित्वात आलेल्या समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणात नगर-नाशिकच्या धरणांमधून पहिल्यांदा 2012मध्ये पाणी सोडावे लागले होते. त्या वेळी जायकवाडीचा साठा होता अवघा 3.84 टक्के. त्यानंतर 2013, 14, 15 असे सलग तीन वर्षे जायकवाडीला पाणी द्यावे लागले. नंतर पुन्हा 2018मध्ये 9 टीएमसी पाणी सोडावे लागले होते. नंतरची चार वर्षे चांगल्या पावसामुळे गरज भासली नसली, तरी यंदा (2023) जायकवाडीचे पोट पुन्हा खपाटीला गेले आहे. त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्याला आपल्या पखाली रिकाम्या कराव्याच लागणार आहेत.

जायकवाडीला पाणी सोडण्याबाबतचे गौडबंगाल…

  1. जायकवाडी धरणातील साठा आणि पावसाळ्यातील टप्प्यांनुसार नगर व नाशिकमधील धरणांतील साठा किती ठेवता येईल, याचे नियम मेंढेगिरी अहवालात घालून देण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जायकवाडीतील जिवंत साठा 37 टक्के असेल, तेव्हा नगर-नाशिक भागातील जिवंत पाणीसाठा मुळा 49 टक्के, भंडारदरा समूह 56 टक्के, गंगापूर समूह 61 टक्के, दारणा समूह 64 टक्के, पालखेड समूह 73 टक्के इतकाच असावा.
  2. दुसर्‍या टप्प्यात जायकवाडीतील पाणीसाठा 54 टक्के असेल, तेव्हा नगर-नाशिकमधील जिवंत पाणीसाठा मुळा समूह 65 टक्के, भंडारदरा समूह 74 टक्के, गंगापूर समूह 74 टक्के, दारणा समूह 84 टक्के, पालखेड समूह 73 टक्के असावा. यापेक्षा जास्त पाणीसाठा नगर-नाशिकच्या धरणामंध्ये करू नये, असा दंडक आहे. असे जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी ‘पुढारी’ला सांगितले.
  3. नगर व नाशिकमधील धरणांतील जिवंत पाणीसाठा (18 ऑगस्ट 2023 च्या नोंदीनुसार) मुळा समूह 75 टक्के, भंडारदरा समूह 91 टक्के, गंगापूर समूह 78 टक्के, दारणा समूह 86 टक्के, पालखेड समूह 54 टक्के असा आहे. दुसरीकडे जायकवाडीतील जिवंत पाणीसाठा अद्याप 37 टक्केही झाला नाही. म्हणजेच नगर-नाशिकच्या धरणांमध्ये टप्पेनिहाय नियोजनापेक्षा जास्त पाणी अडवले गेले हे स्पष्ट आहे.

जिवंत पाणीसाठा
26 टीएमसी जायकवाडी धरण 34 टक्के
07 टीएमसी उजनी धरण 13 टक्के

हेही वाचा

पुरंदर विमानतळ खासगीकरणातून !

लवंगी मिरची : नवे तंत्रज्ञान, नवे शोध

कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होणार : राजेश क्षीरसागर

Back to top button