

पुणे : पुरंदर येथे उभारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ खासगीकरणातून उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही याला दुजोरा दिल्याने पुरंदरच्या 'टेक ऑफ'चा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी पाच हजार कोटी रुपये लागणार आहेत. एवढी मोठी रक्कम एका टप्प्यात उपलब्ध करून देणे राज्य सरकारला शक्य नाही. ही रक्कम राज्य सरकारला अदानी समूहाने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. तसा प्रस्ताव त्यांच्याकडून राज्य शासनाकडे दाखल झालेला आहे. .
पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील 2,832 हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा राज्य सरकारने आठ वर्षांपूर्वी केली होती. केंद्र आणि राज्य सरकार तसेच एअरपोर्ट अॅथॉरिटी, संरक्षण मंत्रालयाने त्या जागेसाठी हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र, निधीअभावी केंद्र आणि राज्यपातळीवर विमानतळाच्या कामाची चालढकल सुरू असल्याचे वास्तव समोर आले होते. आता मात्र अदानी समूहाने पैसे देण्याची तयारी दर्शविल्याने हे विमानतळ खासगी निधीतून उभे करण्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी विमानतळ गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या केंद्र सरकारने दिल्या आहेत. बारामती, दौंड आणि पुरंदर या 3 तालुक्यांतील आठ गावांतील सुमारे 3500 एकर जमिनीवर अदानी समूहाच्या वतीने मल्टिमेडल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून, यामध्ये खासगी विमानतळ प्रस्तावित आहे. यासंदर्भातील प्रस्ताव औद्योगिक महामंडळाने केंद्र शासनाला पाठविला आहे.
लवकरच टेकऑफ
अदानी समूहाचा पुरंदर विमानतळाचा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय होणार आहे. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचे काम एमआयडीसी किंवा महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडून होणार आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय येत्या दोन महिन्यांत होणार आहे. त्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झालेल्या आहेत.
शरद पवार-अदानी भेटीचे रहस्य…
मल्टिमेडल लॉजिस्टिक पार्कसाठी पुरंदर तालुक्यातील राजुरी, पिसे, नायगाव आणि पिंप्री, बारामती तालुक्यातील आंबी, भोंडवेवाडी आणि चांदगुडेवाडी तर दौंड तालुक्यातील खोर या 8 गावांमधील 3500 एकर जमीन घेण्यात येणार आहे. औद्योगिक महामंडळाने या जागेचे सर्वेक्षण करून मल्टिमेडल लॉजिस्टिक पार्कच्या आराखड्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला मान्यतेसाठी पाठविला आहे. मध्यंतरीची पवार-प्रफुल्ल पटेल यांची अचानक अहमदाबाद भेट, तसेच मोदी – पवारांच्या भेटी, त्यानंतर पवारांकडून अदानी यांची स्तुती, या सगळ्यामागे बारामतीचे खासगी विमानतळ असल्याची चर्चाही आता रंगू लागली आहे.
हेही वाचा :