UFO : उडत्या तबकड्यांचे रहस्य | पुढारी

UFO : उडत्या तबकड्यांचे रहस्य

नीलेश बने

अमेरिकेत पुन्हा एकदा ‘यूएफओ’ म्हणजेच परग्रहावरील उडत्या तबकड्या आणि परग्रहवासी यांची चर्चा सुरू झालीय. याला कारण ठरलंय अमेरिकेचे माजी गुप्तचर अधिकारी डेव्हिड ग्रुश यांनी केलेल्या दाव्याचं. ग्रुश यांनी परग्रहावरील जीवनाचा शोध घेणारा कार्यक्रम अमेरिका लपवत आहे, असा दावा केलाय. एवढंच नाही, तर एक ‘यूएफओ’ आणि परग्रहवासीयांचा देहही अमेरिकेने लपवलाय, असं त्यांचं म्हणणं आहे.

या अनादी अनंत विश्वात आपण एकटेच आहोत की, पृथ्वीप्रमाणे आणखी कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे? याबद्दल माणसाला कायमच गूढ वाटत आलंय. आजवर या विषयावर कित्येक विज्ञानकथा लिहिल्या गेल्यात, त्यावर चित्रपटही येऊन गेलेत. एवढंच काय, तर स्टिफन हॉकिंग, जयंत नारळीकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनाही याबद्दल आकर्षण वाटत आलंय; पण आता पुन्हा एकदा परग्रहवासीय आणि त्यांच्या उडत्या तबकड्या चर्चेत आल्यात. यासंदर्भात, गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या हाऊस ओव्हरसाईट कमिटीच्या राष्ट्रीय सुरक्षा उपसमितीसमोर एक महत्त्वाची साक्ष झाली. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अमेरिकेतील हवाईदल आणि नॅशनल जिओस्पेशियल इंटेलिजन्स एजन्सीमध्ये 14 वर्षे गुप्तचर अधिकारी म्हणून काम केलेले डेव्हिड ग्रुश आणि त्यांचे दोन पायलट सहकारी यांची त्यांच्या उडत्या तबकड्यांविषयीच्या दाव्याबद्दल चौकशी करण्यात आली.

काय आहे डेव्हिड ग्रुश यांचा दावा?

डेव्हिड ग्रुश यांनी व्हिसल ब्लोअर म्हणून काही गोष्टी उघड केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन इंटेलिजन्सकडे परग्रहावरून आलेल्या उडत्या तबकड्या आहेत. या तबकड्यांना इंग्रजीत अनआयडेन्टिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्टस् (णऋज) असं म्हणतात. या अशा घटनांना सध्याच्या नव्या परिभाषेनुसार अज्ञात आकाशीय घटना म्हणजेच अनआयडेन्टिफाईड एरियल फिनॉमिना (णअझ) असंही म्हटलं जातं.

अमेरिकन शास्त्रज्ञांचा या तबकड्यांचा उपयोग करून रिव्हर्स इंजिनिअरिंगद्वारेे अनोखी शस्त्रे बनवण्याचा मानस आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ गेली अनेक वर्षे या ‘यूएफओ’वर काम करत असून, त्यांनी अनेक ‘यूएफओ’ क्रॅश केले आहेत. तसेच काही ‘यूएफओ’ हे स्वतः अपघातग्रस्त झालेले आहेत. त्यातील परग्रहवासीयांचे देहही अमेरिकेकडे असून, त्यावरही संशोधन सुरू आहे.

ग्रुश यांच्या मते, त्यांना याबद्दलची पक्की माहिती आणि पुरावेही आहेत; पण त्यांनी स्वतः हे परग्रहवासीयांचे मृतदेह किंवा हे संशोधन पाहिलेले नाही. हा गुप्त कार्यक्रम असून, निवडक अधिकारीच तिथे जाऊ शकतात. जेव्हा त्यांनी याविषयी काही विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिथल्या अधिकार्‍यांनी त्यांना तोंड बंद ठेवण्यास सांगितले.

‘यूएफओ’संदर्भातील शेकडो घटनांची नोंद

डेव्हिड ग्रुश यांच्या या खळबळजनक दाव्यानं हा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला; पण ही काही आजची घटना नाही. आजवर अनेकांनी या उडत्या तबकड्या पाहिल्याचा दावा केला आहे. ‘नासा’सारख्या अंतराळ संशोधन संस्थेनं गेल्यावर्षी या अशा घटनांच्या अभ्यासासाठी एक समिती नेमली. त्यांच्या माहितीनुसार, गेल्या दहा वर्षांत 800 हून अधिक घटना नोंदवल्या गेल्यात.

या सर्व घटनांची सुरुवात होते ती 1947 मध्ये. यासंदर्भातील पहिली बातमी 24 जून 1947 रोजी आली होती. केनेथ अरनॉल्ड या स्वतः पायलट असलेल्या उद्योगपतीनं वॉशिंग्टनजवळील माऊंड रेनियर येथे ‘यूएफओ’ पाहिल्या होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा वेग जवळपास ताशी 2,700 किलोमीटर एवढा होता. त्यानंतर या अशा उडत्या तबकड्या दिसण्याच्या घटना वाढल्या.

1947 ते 1969 या काळात अमेरिकन हवाईदलानं ‘प्रोजेक्ट ब्ल्यू लूक’ नावाची शोधमोहीमही चालवली होती. त्यात हजारो अहवाल तपासले गेले होते. त्यानंतर 2020 मध्ये ‘यूएफओ’ची तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या अमेरिकन टास्क फोर्सने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये, 2004 ते 2021 या कालावधीत तब्बल 144 उडत्या तबकड्या म्हणजेच ‘यूएफओ’ पाहिल्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

ग्रुश यांच्या चौकशीत काय घडलं?

अमेरिकेच्या संसदेत झालेल्या सर्वपक्षीय चर्चेत डेव्हिड ग्रुश यांची साक्ष झाली. तेव्हा त्यांनी आपले सगळे दावे पुन्हा मांडताना आणखी एक गोष्ट स्पष्ट केली की, अमेरिकेचे आजचे कायदे या घटना लोकांपुढे आणण्यासाठी असमर्थ आहेत. गोपनीयतेच्या नियमांमुळे यातील अनेक गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत; पण सरकारी अधिकार्‍यांनी माहिती लपवली आणि व्हिसल ब्लोअर्सना शिक्षाही केलीय. यावेळी अमेरिकन नौदलाचे निवृत्त कमांडर डेव्हिड फ्रॅव्हर यांनीही आपली मतं मांडली. ते म्हणाले की, 2004 मध्ये त्यांनी अशा एका अज्ञात आकाशीय घटनेचा (यूएपी) अनुभव घेतला होता. या घटनेनं विमान चालकांना चकित केलं होतं. त्याचं फुटेजही 2017 मध्ये प्रसिद्ध झालं होतं. आम्ही जे काही पाहिलं ते आपल्याकडं असणार्‍या तंत्रज्ञानाच्या कैकपट पुढे आहे.

रिपब्लिकन खासदार नॅन्सी मेस यांनी ग्रुश यांना परग्रहवासीयांच्या देहाबद्दलचा प्रश्न विचारला. त्यावर ग्रुश म्हणाले, या आकाशीय घटनांमध्ये सापडलेल्या साहित्यात काही जीवशास्त्रीय घटक होते. मी ते प्रत्यक्ष पाहिलेले नाहीत; पण या प्रकल्पावर थेट काम करणार्‍याने मला दिलेल्या माहितीनुसार, ते घटक मानवी देहाचे नव्हते.

अमेरिकन्स फॉर सेफ एरोस्पेसचे कार्यकारी संचालक रायन ग्रेव्हस् यांनी यावेळी आपलं मत मांडताना सांगितलं की, या सगळ्या घटनांसंदर्भात बोलण्यासाठी कोणीही उत्सुक नसतो. कारण, त्याला त्याची नोकरी जाईल आणि शिक्षा होईल, याची भीती असते. अमेरिकेला अशा एका यंत्रणेची गरज आहे की, जिथे ही माहिती देणार्‍या माणसाला पूर्ण सुरक्षा मिळेल आणि त्याला त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन गमवावं लागणार नाही.

खरं काय ते कधी कळेल का?

आकाशात घडणार्‍या या सगळ्या अगम्य गोष्टींबद्दल आजवर अनेकदा उलटसुलट चर्चा झाली आहे. ग्रुश यांच्या दाव्यानंतर आता पुन्हा अमेरिकेत सुरू झालेल्या चर्चेचा सूरही असाच आहे की, खरं काय ते एकदा जगासमोर यावं. अमेरिकेच्या संसदेतील दोन्ही बाजूंच्या खासदारांनीही या संदर्भात तपास आणि लष्करी पारदर्शकतेची मागणी केलीय.

अमेरिकेतील अनेक खासदारांनी या चर्चेसंदर्भात बोलताना सांगितलं की, या परग्रहवासीयांच्या चर्चेतील सत्य कळणं आवश्यक आहे; कारण हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे. यातील छोटीशी चूकही महागात पडू शकते. त्यामुळे यासाठी गरज असल्यास गोपनीयतेच्या कायद्याचाही पुनर्विचार व्हावा. व्हिसल ब्लोअर म्हणून आज जे पुढे येताहेत त्यांना संरक्षणही मिळायला हवं.

‘बीबीसी’नं याचं वृत्तांकन करताना असं म्हटलंय की, आकाशातील अज्ञात घटनांनी अमेरिकन संसदेतील सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र आणलंय. या खासदारांनी कितीही, काहीही म्हटलं तरी या सगळ्या घटनांमागील सत्य समोर येईल, हे म्हणणं धाडसाचं आहे. अमेरिकेच्या राजकीय महत्त्वाकांक्षा, त्यासाठी बनविलेले गुप्त कार्यक्रम आणि त्यासाठी असलेलं कायद्याचं सरंक्षण पाहता, खरं जगासमोर येणं अवघड आहे.

हे महासत्तांमधील स्पेसवॉर तर नाही ना?

अमेरिका आणि त्याच्या अवकाश कार्यक्रमांबद्दल एक छोटंसं उदाहरण लक्षात घ्यायला हवं. 20 जुलै 1969 रोजी अमेरिकेच्या अपोलो 11 या अंतराळयानातून नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पाय ठेवले. माणसाच्या अवकाशविजयाच्या या सर्वोच्च घटनेला 54 वर्षं झाली तरी त्याबद्दल आजही खर्‍याखोट्याचे दावे केले जातात. त्यासंदर्भात मोठमोठ्या वाहिन्यांनी केलेल्या फिल्मस्मध्येही त्याबद्दल संशय व्यक्त केला जातो. त्यासाठी रशिया आणि अमेरिका यांच्यात झालेल्या अंतराळयुद्धाचे दाखले दिले जातात. गेली कित्येक दशके हे सगळं सुरू आहे. या दोन्ही महासत्तांमध्ये चांद्रमोहिमेवरून झालेली स्पर्धा, ही आकाशातही स्वतःचं सामर्थ्य प्रस्थापित करण्याची लढाई होती, हे काही आता गुपित राहिलेलं नाही.

आता रशिया आणि अमेरिका यांच्यासोबत चीनही या सत्तेत उतरलाय. त्यामुळेच अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या परग्रहवासीयांच्या चर्चेला आंतरराष्ट्रीय घटनांच्या पार्श्वभूमीवर समजून घ्यायला हवं. विशेषतः, रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना अमेरिकेतील परग्रवासीयांची चर्चा काही वेगळे संदर्भ देऊ शकते. दुसर्‍या महायुद्धानंतर जगाची युद्धभूमी बदलली असून, आता लढाई फक्त रणांगणावरच नाही, तर आकाशात आणि माहितीच्या आधारे माणसाच्या मेंदूतही खेळली जाणार आहे. डेटा हा हे नवं शस्त्र आहे, हे लक्षात घ्यायला हवं. या सगळ्यातील खरं काय, खोटं काय, हे कदाचित कधीच कळणार नाही; पण जमेल तेवढे हे समजून घ्यायला हवं. कारण, हा फक्त डोक्यावरील आकाशातला खेळ नसून, जागतिक सत्ताकारणाच्या अवकाशातलाही खेळ आहे. रशिया, अमेरिका, चीन हे यातील मुख्य खेळाडू आहेत. त्यामुळे वरकरणी हा सिनेमात दिसणार्‍या उडत्या तबकड्यांचा खेळ दिसत असला, तरी यामागे फार काही दडलेलं असू शकतं.

Back to top button