रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स’ नगरमध्ये दाखल ! | पुढारी

रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स’ नगरमध्ये दाखल !

नगर : पुढारी वृत्तसेवा : मोहरम मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी केंद्रीय रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सची (शीघ्र कृती बल) विशेष तुकडी नगरमध्ये दाखल झाली आहे. मोहरम विसर्जन मिरवणूक मार्गावर मंगळवारी (दि. 18) रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या तुकडीकडून संचालन करण्यात आले. कोतवाली व तोफखाना पोलिसांच्या पथकाचाही या संचालनात समावेश होता. मुस्लिम धर्मीयांच्या मोहरम सणाला गुरुवारपासून (दि. 20) प्रारंभ होत असून, मोहरम विसर्जन मिरवणूक 29 जुलै रोजी निघणार आहे. नगरमधील मोहरम विसर्जन मिरवणूक देशातील तिसर्‍या क्रमांकाची मानली जाते.

त्यामुळे या मिरवणुकीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी धार्मिक वातावरण बिघडविण्याच्या घटना नगर शहरात घडल्याने पोलिस प्रशासनाकडून मोहरम मिरवणुकीवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे विशेष पथक नगरमध्ये दाखल झाले आहे. मंगळवारी शहरातून संचालन करण्यात आले. कोठला, रामचंद्र खुंट, हातमपुरा, जुनाबाजार, पंचपीर चावडी, कोर्ट गल्ली या मोहरम विसर्जन मिरवणूक मार्गावर हे संचालन झाले. रॅपिड अ‍ॅक्शन फोर्ससह कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखान्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

पथकात 70 जवान
रॅपिड अ‍ॅक्शन फोर्समध्ये महिला व पुरुष अशा 70 जवानांचा समावेश आहे. या पथकाचे प्रमुख डीसीपी आलोककुमार झा हे असून, मोहरम मिरवणूक संपेपर्यंत या पथकाचा नगरमध्ये मुक्काम असणार आहे.

पोलिस अधीक्षकांनी घेतला आढावा
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी मंगळवारी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून नियम मोडणार्‍यांवर कारवाई करा, रात्री अकरानंतर हॉटेले व इतर दुकाने बंद करण्याचे आदेशही त्यांनी यंत्रणेला दिले.

हे ही वाचा :

Gigi Hadid : गांजा सापडल्याने सुपरमॉडल गिगी हदीदला आधी अटक नंतर जामीनावर सुटका

Ashish Sakharkar Passes Away : मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचे निधन

Back to top button