अहमदनगर : चौदाव्या वित्त आयोगास मुदतवाढ | पुढारी

अहमदनगर : चौदाव्या वित्त आयोगास मुदतवाढ

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : चौदाव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधी खर्चासाठी आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे असलेल्या 7.5 कोटींच्या अखर्चित निधी खर्चाला परवानगी मिळाली आहे. यातून तब्बल दोन ते अडीच हजार विकासकामे मार्गी लागणार असल्याने ग्रामविकासात भर पडणार आहे.
केंद्रीय आयोगाच्या 14 व्या वित्त आयोगाचा निधी खर्चासाठी पाच वर्षांची मुदत असते. नगर जिल्ह्यातील 1318 ग्रामपंचायतींना 100 टक्के प्रमाणे तब्बल 716 कोटींचा निधी प्राप्त झाला होता. यातून 66 हजार कामे घेण्यात आली होती.

या खर्चासाठीची 31 मार्च 2020 रोजीची अंतिम मुदत होती. मात्र या मुदतीत 62 हजार कामे पूर्ण होऊ शकली, तर 7.5 कोटींची अखर्चित रक्कम दिसत होती. 2500 पेक्षा अधिक कामे प्रशासकीय मान्यता होऊनही सुरू झालेली नव्हती. दरम्यान, कोरोना संकटामुळे खर्चाला अडचणी आल्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानुसार 31 मार्च 2023 पर्यंत शासनाने या खर्चासाठी मुदत दिली होती. मात्र या मुदतीतही अनेक ग्रामपंचायतींचा खर्च होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे अजूनही 7.5 कोटी रुपये शिल्लक दिसत होते.

या अखर्चित निधीच्या खर्चासाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी अनेक जिल्हा परिषदांमधून मागणी करण्यात आली होती. त्यावर निर्णय घेताना शासनाचे उपसचिव राजेश भोईर यांनी या खर्चासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देत असल्याचे पत्र काढले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे 7.5 कोटी रुपये पुन्हा खर्च करता येणार आहेत. यातून गावोगावी विकासाची गंगा वाहती होणार आहे. दरम्यान, 2020-21 नंतर 15 व्या वित्त आयोगाचा निधी मिळण्यास सुरुवात झाली आहे.

चौदावा वित्त आयोग तपशील

तालुका शिल्लक निधी
अकोले 85 लाख
संगमनेर 23 लाख
कोपरगाव 13 लाख
राहाता 65 लाख
राहुरी 38 लाख
श्रीरामपूर 22 लाख
शेवगाव 36 लाख
नेवासा 88 लाख
पाथर्डी 60 लाख
जामखेड 70 लाख
कर्जत 47 लाख
श्रीगोंदा 87 लाख
पारनेर 90 लाख
नगर 28 लाख

 हेही वाचा

पिंपरी : पीओपीच्या गणेशमूर्ती बनविण्यास बंदी

Maharashtra Political Crisis | १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव

पिंपरी : बहुतांश स्थानिक पदाधिकारी अजित पवारांसोबत

Back to top button