पिंपरी : बहुतांश स्थानिक पदाधिकारी अजित पवारांसोबत | पुढारी

पिंपरी : बहुतांश स्थानिक पदाधिकारी अजित पवारांसोबत

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकार्‍यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यांची भेट घेण्याचा सपाटा आजही कायम आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबत असल्याचे सध्या तरी स्पष्ट होत आहे. काही पदाधिकार्‍यांनी थेट पिंपरी-चिंचवड महापालिकेत एन्ट्री करीत अधिकार्‍यांकडून आवश्यक ‘ती’ माहिती घेण्यास सुरुवातही केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे.

शिंदे व फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत अजित पवार यांनी रविवारी (दि. 2) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरावर अजित पवार यांची पूर्वीपासून मजबूत पकड आहे. त्याच दिवशी राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राजू मिसाळ, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे तसेच, अनेक पदाधिकार्‍यांनी त्यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले. तर, शहरात काही पदाधिकार्‍यांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला.

काही पदाधिकार्‍यांनी सोमवारी (दि.3) अजित पवार यांची भेट घेतली. तसेच, काही मोजक्याच पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. त्यामुळे काही पदाधिकारी दुहेरी भूमिकेत असल्याचे दिसत आहे. त्याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. तर, प्रशासकीय राजवट असल्याने तसेच, शिंदे-फडणवीस सरकार असल्याने पालिकेत फिरकत नसलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी आता सक्रिय झाले आहेत. काही पदाधिकार्‍यांनी सोमवारी (दि. 3) पालिकेच्या प्रमुख अधिकार्‍यांची भेट घेऊन मोठ्या प्रकल्पांसंदर्भातील कागदपत्रे व माहिती घेतली.

शरद पवारांची भेट घेतली

मी कालच शरद पवार यांची भेट घेतली आहे. सात तारखेनंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. घरगुती कार्यक्रमात मी सध्या व्यस्त आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी सांगितले.

पक्ष एकसंघ राहावा अशी अपेक्षा

वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आम्ही आहोत. पक्ष एकसंघ राहावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे. यातून चांगले काही निष्पण होईल, अशी आशा आहे. शहरातील सर्व पदाधिकार्‍यांशी फोनवर बोलून मते घेत आहे. अजित पवार यांचे पूर्वीपासून पिंपरी-चिंचवड शहरावर विशेष लक्ष असून, प्रत्येक घडामोडीवर ते नेहमी सजग असतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले. काल मी शहराबाहेर असल्याने फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होता. रात्री उशिरा शहरात दाखल झालो, असे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार व अजित पवार दोघांना भेटलो

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आम्ही भेट घेतली. ते दोघे आमचे नेते असून, त्या दृष्टीने त्यांची भेट घेतली. त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी असल्याने विशेष चर्चा झाली नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत चित्र अधिक स्पष्ट होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.

अजित पवार पालिकेत बैठक घेणार

अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहरावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे त्यांचे शहरातील सर्वच घडामोडींवर विशेषत: महापालिकेच्या कारभारावर नेहमीच लक्ष असते. स्थानिक पदाधिकार्‍यांकडून ते शहराबाबत सातत्याने फॉलोअप घेत असतात. त्यामुळे ते महापालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवून आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी तातडीने पुढील आठवड्यात पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांसोबत बैठक ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या अजेंड्यावर पिंपरी-चिंचवड पालिका वरच्या स्थानी असल्याचे स्पष्ट होत आहे.

पालिका अधिकार्‍यांना बदलीची धास्ती

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सुमारे 15 वर्षे सत्ता होती. अजित पवार यांच्या कामाच्या धडाका पालिकेच्या अधिकार्‍यांना माहीत आहे. ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्याने पालिकेची रखडलेली अनेक कामे मार्गी लागून पुन्हा वेगात सुरू होतील, असे अपेक्षा अधिकारी खासगीत व्यक्त करीत आहेत. ते उपमुख्यमंत्री झाल्याने कामकाजाला खर्‍या अर्थाने गती मिळेल, असे बोलले जात आहे. तर, राष्ट्रवादीविरोधी भूमिका घेऊन कामे अडविणार्‍या अधिकार्‍यांची गोची झाली आहे. आपली बदली तर होणार नाही ना, अशी धास्ती त्यांनी घेतली आहे.

हेही वाचा

Maharashtra Political Crisis | १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव

वळसे-पाटलांच्या मंत्रिपदामुळे खेड, जुन्नरचे आमदार संभ्रमात!

नारायणगाव : शिवनेरी शरद पवार यांच्याच पाठीशी असल्याचे चित्र

Back to top button