नगर : कागदावरच्या झाडांवर काढला लाखोंचा खर्च? | पुढारी

नगर : कागदावरच्या झाडांवर काढला लाखोंचा खर्च?

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मांडवे खुर्द येथे गेल्या वर्षी करण्यात आलेल्या लागवडीतील बोटावर मोजण्याइतकीही झाडे जिवंत राहिली नाहीत. त्यामुळे या लागवडीवरील खर्च वाया गेल्याचे दिसून येत आहे. वृक्षलागवड केली की नाही? केली तर झाडे जिवंत का नाही? लाखोंचा खर्च त्यावर का केला? याप्रकरणी संबंधित दोषी अधिकार्‍यांची चौकशी होऊन तत्काळ कारवाई होणे गरजेचे आहे.
सामाजिक वनीकरण विभागाने तालुक्यातील अनेक भागांमध्ये खड्डे खोदून वृक्षलागवड केली होती. खड्डे कमी खोदून नेहमीच जास्त दाखविण्याचा प्रयत्न वन विभाग व सामाजिक विभाग करीत असल्याची चर्चा आहे. सामाजिक वन विभागाने मांडवा खुर्द येथे वृक्षलागवड केली असून, त्यावर लाखो रुपयांचा खर्च केला. परंतु अनेक ठिकाणी वृक्ष दिसतच नाहीत..

वृक्ष जिवंत ठेवण्याच्या नावाखाली वृक्ष नसलेल्या ठिकाणी कागदावर टँकरद्वारे पाणी टाकण्याचा सपाटा लावला जात आहे. लाखो रुपयांना चुना लावण्यात आला आहे, मोठा गाजावाजा करीत वृक्षलागवड केली जाते. नंतर त्या वृक्षांची काळजी फक्त कागदावरच घेतली जात असल्याने वृक्षलागवडीचे मांडव्यातील डोंगरावर नुसते खड्डे दिसून येत आहेत. लागवड केली असताना जिवंत रोपांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच कशी, याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी केल्यास सत्य समोर येईल. अनेक वृक्षप्रेमींनी वृक्षलागवडीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी
सरकारी योजनेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी आता सामाजिक वनीकरण विभागाने जबाबदारी घेऊन संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. वृक्षलागवड झाली. मात्र, हे वृक्ष गायब आहेत. त्यामुळे पारनेरच्या सामाजिक वनीकरण अधिकार्‍यांनी संगनमताने लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे.फफ

वृक्ष गायब होऊनही खर्च चालूच…
वृक्षारोपणाचे शासकीय आकडे कोटीच्या घरात आहेत. अशातच वृक्षारोपण केवळ आकड्यांचा खेळ असल्याचे समोर आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाने मांडवा खुर्द येथील डोंगरावर लागवड केलेली 11 हजार वृक्ष गायब झाले असून त्यांच्या देखभालीसाठी मजूर व इतर खर्च आजही सुरू आहे.

हे ही वाचा : 

शिर्डीत गुरुपौर्णिमानिमित्ताने भाविकांची मांदियाळी

पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांकडे?

Back to top button