Ashadhi wari 2023 : भगवानगडाच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान | पुढारी

Ashadhi wari 2023 : भगवानगडाच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

खरवंडी कासार(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पढंरपूरच्या आषाढी एकादशी यात्रे उत्सवानिमित्त पांडुरंगाच्या भेटीसाठी संत भगवानबाबाच्या पालखी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे भगवानगडावरून सायंकाळी चार वाजता प्रस्थान ठेवले. यावेळी पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी केली. भगवानगडाचे संस्थापक, संत भगवानबाबांनी नारायणगडावर असताना मराठवाड्यातून पहिला पालखी सोहळा प्रारंभ केला होता. हीच परंपरा भगवानगडाच्या स्थापनेपासून ते आजतागायत सुरू आहे. भगवानगडावरून निघणार्‍या या पालखी सोहळ्याचे प्रस्थान दुपारी चार वाजता झाले.

पालखीचे मुक्काम भारजवाडी, बावी, खोकरमोह, करंजवन, डिघोळ, जयवंतनगर, कुंबेफळ, पिपरी, कुर्डुवाडी, ढेकळेवाडी असे होणार आहेत. अकराव्या मुक्कामी पालखी पंढरपूरमध्ये पोहोचते. दरम्यान प्रस्थानापासून ते पंढरपूरमध्ये पोहोचेपर्यंत अनेक दिंड्या भगवानगडाच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात.

यामध्ये प्रामुख्याने अंभोरे येथील भोसले महाराजांची दिंडी, गुंजमूर्ती संस्थान, शेषाबाई संस्थान तांबवा, रामगड संस्थान, विठ्ठलगड संस्थान, रामेश्वर संस्थान, भगवानबाबा संस्थान सुपेसावरगाव, भोगलवाडी संस्थान, राजा हरिश्चंद्र संस्थान, जवळा ग्रामस्थ, बोरकिन्ही ग्रामस्थ, भाग्येश्वर संस्थान तरडगव्हण, गणपतबाबा संस्थान सावरगाव, कुमंडलेश्वर संस्थान घोगस पारगाव, सिद्धेश्वर संस्थान शिरूर कासार, मायंबा संस्थान भालगाव, भगवानबाबा संस्थान छत्रपती संभाजीनगर-पैठण-आळंदी, कानिफनाथ संस्थान खडकवाडी, केशवराज संस्थान वारणी, कानिफनाथ संस्थान खर्डा, हनुमान टाकळी संस्थान, शहर टाकळी संस्थान, कानिफनाथ संस्थान खोकरमोह, सालसिद्धेश्वर संस्थान मिडसांगवी, भगवानबाबा संस्थान तागडगाव आदी संस्थानांचा समावेश आहे.

न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली निघणार्‍या या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, भगवान गडाचे विश्वस्थ व भाविकांची उपस्थिती होते.

समाधीचा अभिषक अन् पादुकांचे पूजन

पालखी प्रस्तानापूर्वी संत भगवानबाबांच्या समाधीचा अभिषक व पादुकांचे पूजन गडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी, न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी केले. यानंतर दर्शन सभागृहात पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली. महिला-पुरुष भाविकांनी रांगेत उभे राहून पादुकांचे दर्शन घेतले. दोन तासांचा दर्शन सोहळा रंगला. यानंतर पालखीचे पूजन गडाचे न्यायाचार्य डॉ नामदेव शास्त्री यांनी केले.

हेही वाचा

नाशिक महानगरपालिका : बेघर निवारा केंद्राचा प्रश्न रखडला; आयुक्त नसल्याचा फटका बसतोय

नाशिक : पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातुर, मृग नक्षत्रही संपण्याच्या मार्गावर

नाशिक : पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातुर, मृग नक्षत्रही संपण्याच्या मार्गावर

Back to top button