नाशिक : पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातुर, मृग नक्षत्रही संपण्याच्या मार्गावर | पुढारी

नाशिक : पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातुर, मृग नक्षत्रही संपण्याच्या मार्गावर

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील पूर्व भागात सध्या जिकडे -तिकडे उन्हाची तीव्रता वाढत आहे. वरुणराजाचे आगमन लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

राजापूरसह परिसरातील शेतकऱ्यांना पाण्यासह चाराटंचाई निर्माण होतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मृग नक्षत्रात पाऊस किती बरसणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी का होईना पाऊस होत असे. पण यावर्षी परिस्थिती उलट झाल्याने चाराटंचाई निर्माण झाली आहे. चारा मिळेल का? या विचाराने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकरी वर्ग हा जगाचा पोशिंदा असला, तरी शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी अनेक संकटे येतात व आता पावसाचे आगमन लांबले असल्याने चाराटंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी वर्ग चाऱ्याच्या शोधात फिरत आहे, तर काही ठिकाणी शेळ्या-मेंढ्यांना लिंबाचा पाला खायला दिला जात आहे.

शेतकऱ्यांना जूनमध्ये पेरणी अपेक्षित होती, मात्र वरुणराजा रुसल्याने एक महिना पेरणी उशिरा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीचे नियोजन कोलमडले आहे. चार-पाच दिवसांत पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांसमोरील संकट आणखी तीव्र होणार आहे. दररोज वादळी वारे वाहात असल्याने बऱ्याच ठिकाणी झाडे व फांद्या तुटत आहेत. गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असली, तरी नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले होते. परिणामी उन्मळून पडलेली झाडे शेतातून बाजूला करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.

हेही वाचा:

Back to top button