शेतकर्‍यांसमोर चार्‍याचा मोठा प्रश्न | पुढारी

शेतकर्‍यांसमोर चार्‍याचा मोठा प्रश्न

रुईछत्तीशी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील रुईछत्तीशी, मठपिंप्री, हातवळण, अंबिलवाडी, वडगाव, वाटेफळ गावात जनावरांच्या चार्‍याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरातील शेतकर्‍यांचा प्रमुख व्यवसाय दूधधंदा असल्याने शेतकरी शेतजमीनीत जनावरांचा चारा घेतात; परंतु सध्या मान्सून लांबणीवर गेल्याने जनावरांना विकत चारा घेण्याची वेळ आली आहे. विहिरी, कुपनलिका, शेततळ्यांनी तळ गाठले आहेत. मृग नक्षत्रात पाऊस पडला तर शेतकरी शेतात मोठ्या प्रमाणात जनावरांचा चारा हेतो. स्वतःच्या मालकीचा चारा असल्याने शेतकर्‍याचा दूध व्यवसाय तेजीत राहतो; परंतु सध्या विकत चारा घ्यावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.

ऊस, मका, घास, वैरण, असा चारा विकत घेण्यासाठी खूप खर्च येतो; परिणाम दूध व्यवसाय कमी होतो. गेल्या एक महिन्यापासून दूध व्यवसायात कमालीची घट झाली आहे. पाऊस वेळेवर आला नाही, तर जनावरांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शेतकर्‍यांची दैनंदिनी याच व्यवसायावर अवलंबून असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. आठ दिवसांत मृग नक्षत्राची पेरणी संपणार आहे. दोन-चार दिवसात पाऊस आला नाही तर पहिले पीक वाया जाणार आहे. एकंदरीत लांबणीवर गेलेला पाऊस शेतकरी आणि जनावरांचे नुकसान करणार आहे.

शेतजमिनीची मशागत उरकली
शेतजमिनीची मशागत शेतकर्‍यांनी करून ठेवली आहे. पाऊस आला की, लगेच पेरणी करण्यावर शेतकर्‍यांचा भर असतो; परंतु पाऊस कधी येणार आणि पेरणी कधी करणार याची चिंता शेतकर्‍यांना लागली आहे. शेजमिनी अशा मशागती करून पडल्या आहेत.

Back to top button