अहमदनगर : माध्य. शिक्षक सोसायटीची सभा गाजणार! | पुढारी

अहमदनगर : माध्य. शिक्षक सोसायटीची सभा गाजणार!

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या कारभाराविरोधात विरोधकांची आंदोलनाची मालिका सुरू आहे, तर विरोधकांच्या या पावित्र्यामुळे बँक ताब्यात असतानाही सत्ताधार्‍यांवरच आंदोलनाची वेळ आल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे. त्यात, शिक्षक सोसायटीची निवडणूक अजून दीड वर्षे लांब असतानाच, सत्ताधारी व विरोधकांमध्ये सुरू असलेल्या ‘बारमाही’ शितयुद्धाचा उद्या मंगळवारी होणार्‍या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

शिक्षक सोसायटीची सत्ता ज्येष्ठ शिक्षकनेते भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळाकडे आहे. संस्थेचे 11 हजारांहून अधिक सभासद आहेत. गेल्यावर्षी शिक्षक नेते कचरे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने वार्षिक सभेच्या नावाखाली लाखोंचा ‘शाही सोहळा’ केला होता. त्यावर विरोधकांनी बोट ठेवल्याचे दिसले होते.

याशिवाय नोकरभरतीवरूनही विरोधकांनी आकांडतांडव केले होते. यात सत्ताधार्‍यांनी विरोधकांचा माईक ओढून घेतल्याने तणावही निर्माण झाला होता. शिक्षकांमधील वाद पोलिसांनी हातात लाठी घेवून सोडविल्याचेही दिसले. त्यामुळे गतवर्षीची वार्षिक सभा चांगलीच गाजली होती. यावर्षी आता मंगळवारी वार्षिक सभा होऊ घातली आहे. त्यामुळे या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

उद्याच्या सभेत अहवालातील विषय क्रमांक सात हा वादाची ठिणगी पेटविणारा ठरू शकतो. संस्थेने डेटा सेंटर उभारण्याचा विषय मंजुरीसाठी ठेवलेला आहे. मात्र, संस्थेची, सभासदांची आर्थिक माहिती त्रयस्थ व्यक्तीच्या हातात देण्यासाठी विरोधांचा तीव्र विरोध आहे. याशिवाय संस्थेच्या सर्व शाखा ऑनलाईन प्रणालीने जोडण्याचे टेंडर 10 जून 2015 रोजी काढलेे होते.

त्यासाठी एक वर्षाचा करार होता. मात्र आजपर्यंत ते काम अपूर्णच आहे. उलट ज्या कंपनीला काम दिले असे दाखवलेले आहे, प्रत्यक्षात ती कंपनीच अस्तित्वात नाही. या कामाच्या मोबदल्यात एका व्यक्तीच्या नावे 18 लाखांचे धनादेश दिल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यावर सभेमध्ये सत्ताधारी काय उत्तर देणार, याकडे 11 हजार सभासदांचे लक्ष असणार आहे. तसेच ज्येष्ठ शिक्षकनेते कचरे हे सेवानिवृत्त झाले असताना, ते तज्ज्ञ संचालक कसे, मग इतर लोक सेवानिवृत्त झाले, त्यांचे काय, हा प्रश्न विरोधक पुन्हा उचलण्याच्या तयारीत आहेत.

संस्थेवर नावालाच चेअरमन, व्हा.चेअरमन असून खरेतर संस्था तज्ज्ञ संचालक चालवत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. उद्या चौकशी लागली तर तज्ज्ञ संचालक नव्हे तर विद्यमान संचालक मंडळ जबाबदार असणार आहेत, याकडे विरोधक लक्ष वेधण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून समजले. नोकर भरतीही वादग्रस्त आहे. संस्थेचे 53 कर्मचारी आहेत. यापैकी बी.कॉम. एम.कॉम. असे लोकांऐवजी बी.ए., बारावी व नववी झालेले कर्मचारी नेमलेले असून, यात नातेवाईक व देवाणघेवाणीचा आरोप विरोधकांनी केलेले आहे.

संस्थेने संगणक खरेदी केलेली आहे, काही परवान्यावरही खर्च केलेला आहे, तसेच मॅनेजरची मनमानी अशा अन्य विषयांवरूनही यावरूनही विरोधक आप्पासाहेब शिंदे, प्रा. बोडखे हे सत्ताधार्‍यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. तर सत्ताधारी मंडळाकडून मात्र नेहमीप्रमाणे प्रा. कचरे हेच आपल्या खास शैलीतून विरोधकांचा समाचार घेणार असल्याचेही सूत्रांकडून समजते.

सभेपूर्वीच विरोधकांची हवा निघाली?

विरोधी मंडळाने प्रा. कचरे यांचे तज्ज्ञ निवडीवर आक्षेप घेतला होता. मात्र संस्थेच्या घटनेमध्ये सेवानिवृत्त सभासद हा कर्जदारास जामीन असल्यास त्या कर्जासाठी जामीन या नात्याने तो जबाबदार आहे. त्यामुळे त्याचे सदस्यत्व राहील, मात्र कर्ज मिळणार नाही. प्रा. कचरे हे एका कर्जदारास जामीनदार आहेत. त्यांना कर्ज मिळणार नाही, मात्र ते सभासद म्हणून कर्ज परतफेडीपर्यंत कायम असणार असल्याचा निकालाच सहकार विभागाने दिला आहे. त्यामुळे प्रा. कचरे यांची तज्ज्ञ संचालक म्हणून केलेली निवड संस्थेच्या उपविधिप्रमाणे असल्याचा दावा संस्थेचे चेअरमन अशोक ठुबे यांनी केली आहे. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे सभेपूर्वीच विरोधकांची ‘त्या’ विषयातील हवा निघाल्याचीही चर्चा आहे.

Back to top button