नगर : कांदा चाळीला लावली आग ! लाखोंचा कांदा खाक ; चोंभूतची घटना | पुढारी

नगर : कांदा चाळीला लावली आग ! लाखोंचा कांदा खाक ; चोंभूतची घटना

पारनेर (नगर )  : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील चोंभूत येथील शेतकरी देविदास देवराम दरेकर यांची कांदा चाळ कुणीतरी मध्यरात्री पेटवून दिली. यात 15 ट्रॉली कांदा जळून खाक झाला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी देविदास दरेकर यांनी दिली. शनिवारी मध्यरात्री साडे बारा दरम्यान शेतकरी देविदास दरेकर यांचे साडू शेतीला पाणी देताना त्यांना दुरून काहीतरी जळत असल्याचे निदर्शनास आले. जवळून पाहिले असता कांदा चाळ जळत असल्याचे समजले. त्यांनी देविदास दरेकर यांस तत्काळ संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.

त्यांनी घटनास्थळी जाऊन उर्वरित चाळ पाण्याने विझून टाकली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण चाळ जळून बेचिराख झाली होती. सकाळी घडलेला प्रकार ग्रामपंचायत सदस्य प्रणल भालेराव यांनी पोलिसांना कळवला व तत्काळ पोलिस मोढवे व झावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या प्रकारचा पंचनामा केला. यावेळी सोसायटी अध्यक्ष दत्तात्रय कोल्हे, खंडू खांडेकर, संतोष वाघुले, सूर्यभान दरेकर, श्रीकांत माळी, प्रकाश म्हस्के, पोलिस पाटील रामदास भालेराव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

आधीच बाजारभाव नाही, त्यात संकट !
सध्या कांदा पिकाला अजिबात बाजार भाव नसताना शेतकरी हवालदिल झाला आहे. अश्या परिस्थितीत कुणीतरी माथेफिरुने कांदा चाळ पेटवण्याचे वाईट कृत्य केले. 15 ट्रॉली असलेला कांद्याला पिकवायला मजूर, खत मिळून 70 हजार खर्च आलेला होता. त्यात बाजारभाव नसताना असे कृत्य केलेे, असे देविदास दरेकर म्हणाले.

‘माथेफिरुंना पोलिसांनी अटक करा’
निषेधार्थ घटनेवर कारवाई करण्याची मागणी पारनेर पोलिसांकडे केली आहे. वारंवार अश्या घटना होत आहेत. यात शेतकर्‍यांचे मोठ नुकसान होत आहे. अश्या माथेफिरुंना पोलिसांनी अटक करावी, असे ग्रामपपंचायत सदस्य प्रणल भालेराव यांनी सांगितले.

Back to top button