..तर, पोस्ट ऑफिसच बंद करू ! बँकेची जागा खाली करा | पुढारी

..तर, पोस्ट ऑफिसच बंद करू ! बँकेची जागा खाली करा

नगर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या चाळीस वर्षांपासून पाठपुरावा करूनही पोस्ट ऑफिस हे शिक्षक बँकेची जागा खाली करत नाही. आता शिक्षक सभासदांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. येत्या दोन महिन्यात जर पोस्ट ऑफिसने जागा खाली केली नाही तर कोणतीही पूर्व सूचना न देता पोस्ट ऑफिस बंद करण्यात येईल,असा इशारा शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी दिला.

शिक्षक बँकेच्या वतीने पोस्ट ऑफिस समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बपूसाहेब तांबे व बँकेच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने पोस्ट ऑफिसचे सीनियर सुप्रीटेंडंट संदीप हादगल यांना निवेदन देण्यात आले. तांबे म्हणाले, बँकेच्या पूर्व पदाधिकार्‍यांनी सहकार्याची व सहानुभूतीची भूमिका घेऊन पोस्ट ऑफिसला काही वर्षांच्या अटीवर जागा दिली होती. परंतु गेल्या 30 वर्षापासून पोस्ट ऑफिस एक रुपये भाडे न देता सुरू आहे.

1983 पासून पोस्ट ऑफिसने शिक्षक बँकेशी कोणताही करारनामा केलेला नाही सदरची जागा शिक्षक बँकेच्या दृष्टीने महत्त्वाची असून नगर मुख्यालयातील शाखा तळमजल्यावर आणल्यास ज्येष्ठ, वयोवृद्ध नागरिक तसेच दिव्यांग खातेदार व ठेवीदारांना सोयीचे होणार आहे. तसेच मुख्यालय इमारतीत चार मजले असून चढउतारासाठी लिफ्टची सोय करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आमची जागा लवकर खाली करा, असे तांबे यांनी सुनावले. पोस्ट ऑफिसचे सीनियर सुप्रीटेंडंट संदीप हादगल यांनी लवकरच पोस्ट ऑफिस दुसरी जागा शोधून, शिक्षक बँकेची जागा आम्ही खाली करू, असे आश्वासन दिले.

यावेळी चेअरमन संदीप मोटे, विठ्ठलराव फुंदे माजी चेअरमन साहेबराव अनाप, संतोष दुसुंगे, अर्जुन शिरसाट, बँकेचे संचालक बाळासाहेब तापकीर, बाळासाहेब सरोदे, सूर्यकांत काळे, ज्ञानेश्वर शिरसाट, रमेश गोरे, कल्याण लवांडे, बाळासाहेब कापसे, राजेंद्र निमसे, विजय ठाणगे, विजय नरवडे, सुयोग पवार, डी.एम.शिंदे, शिक्षक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपराव मुरदारे, गणेश गायकवाड, प्रदीप दळवी, संजय वाघ, जितू रहाटे उपस्थित होते.

Back to top button