राजकारणातील मुरब्बी शिलेदार उतरले बाजार समितीच्या आखाड्यात | पुढारी

राजकारणातील मुरब्बी शिलेदार उतरले बाजार समितीच्या आखाड्यात

वाळकी : पुढारी वृत्त्तसेवा :  बाजार समितीच्या राजकीय रणांगणात भाजप व महाविकास आघाडीत सामना रंगणार आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे उमेदवार निवडणुकीत उतरले असून त्यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशीकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या राजकीय आखाड्यात मुरलेल्या उमेदवारांनी शड्डू ठोकले आहेत. जिल्हा बँकेतील जिव्हारी लागलेल्या पराभवाचा वचपा काढण्याची रणनिती आखली जात आहे.

बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच कर्डिले गट विरुद्ध महाआघाडी असा कडवा संघर्ष पहावयास मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीला नुकत्याच झालेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीची किनार राहणार आहे. या निवडीत कर्डिले व खासदार डॉ. सुजय विखे यांनी महाआघाडीला धोबीपछाड देत जिल्हा बँकेत सत्ता मिळविलेली आहे. त्यामुळे याचा वचपा काढण्यासाठी महाआघाडी रणनीती आखत आहे.

महाआघाडीचे स्थानिक नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. या शिवाय माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे, आ.नीलेश लंके, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार हेही महाआघाडीच्या स्थानिक नेत्यांना बळ देत आहेत. सत्ताधारी कर्डिले गटासमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीतील शिलेदारांना व प्रमुख पदाधिकार्‍यांना बाजार समितीच्या रणांगणात उतरविण्याची तयारी महाआघाडीने केली आहे. त्यामुळेच यावेळी महाआघाडीकडून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या वाढली आहे.

बाजार समितीतील सत्ताधारी कर्डिले गटाला महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संदेश कार्ले, शरद झोडगे, माजी सभापती रामदास भोर, राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब हराळ, तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, काँग्रेसचे संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, अंकूश शेळके, उद्योजक अजय लामखडे यांच्या माध्यमातून तगडे आव्हान देणार आहेत . त्यातच मागील वेळी तज्ञ संचालक म्हणून माजी आ. कर्डिले यांनी पुतणे संदीप कर्डिले यांना संधी दिली, तेच संदीप कर्डिले आता आघाडीकडून मैदानात उतरले आहेत .

गेल्या पंधरा वर्षापासून कर्डिले-कोतकर गटाने कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती वर्चस्व राखले आहे. नगर तालुका महाविकास आघाडीकडून गेल्या तीन निवडणुकांमध्ये बाजार समितीवरील कर्डिले-कोतकरांचे वर्चस्व मोडीत काढण्यात यश आलेले नाही. आता या निवडणुकीत कर्डिले यांना खा.सुजय विखे यांची साथ आहे. शिवाय मागील वर्षी झालेल्या सोसायट्यांच्या निवडणुका आणि तीन चार महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निवडून आलेल्यांमध्ये कर्डिले समर्थकांची संख्या सर्वाधिक असल्याचा दावा कर्डिले गटाकडून वेळोवेळी करण्यात आलेला आहे.

आणि तेच बाजार समिती निवडणुकीसाठी मतदार असल्याने चौथ्यांदा बाजार समितीवर सत्ता मिळविण्याचा दावा कर्डिले गटाकडून केला जात आहे. त्यामुळे कर्डिले गटाकडून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या यावेळीही मोठी आहे. कर्डिले गटाकडून सुरु असलेली जय्यत तयारी आणि कर्डिले गटाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून आखण्यात येत असलेली रणनीती पाहता यावेळची निवडणुक चांगलीच चुरशीची आणि रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

उमेदवारीसाठी नेत्यांची मनधरणी
भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरणारांची संख्या मोठी आहे . त्यामुळे उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच निर्माण होणार आहे . उमेदवारी कायम ठेवण्यासाठी नेत्यांच्या दरबारात इच्छुकांची मांदियाळी वाढली आहे. अर्ज माघारीसाठी मनधरणी करताना नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

यांच्या उमेदवारीने रंगणार सामना
भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीतील मुरब्बी बाजार समिती निवडणूकीच्या आखाड्यात उतरले आहेत . यात जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश काले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, उद्योजक अजय लामखडे, माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे नातू अंकूश शेळके , रोहिदास कार्डले , संदीप कर्डीले यांनी राजकीय आखाड्यात भाजपा विरोधात दंड थोपटल्याने बाजार समितीची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

काठावरच्या गावांचे मतदान ठरणार निर्णायक
भाजप व महाविकास आघाडीकडून सर्वाधिक ग्रामपंचायत , सेवा सोसायट्या ताब्यात असल्याचे सांगितले जात आहे . मात्र यात बरीचशी गावे काठावरची असल्याचे आज तरी दिसत आहे . या गावातील मतदान आपल्याच बाजुला वळविण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न सुरु आहेत . त्यामुळे बाजार समिती निवडणूकीत काठावरची मते निर्णायक ठरणार आहेत .

Back to top button