नगर : विस्तार अधिकार्‍यांची निम्मी पदे रिक्त | पुढारी

नगर : विस्तार अधिकार्‍यांची निम्मी पदे रिक्त

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात शिक्षण विस्तार अधिकार्‍यांची निम्म्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. ही पदे त्वरित भरण्याची मागणी होत आहे. अनेक केंद्रप्रमुख शिक्षण विभागात पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषदेकडून शिक्षण विभागात केंद्रप्रमुखांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून थांबलेली आहे. दरम्यान, या वर्षभरात अनेक पात्र केंद्रप्रमुख पदोन्नतीच्या आशेमध्येच निवृत्त झाले आहेत. या पदोन्नतीचा लाभ त्यांना मिळाला नाही. आता ज्यांची सेवा अवघी दोन ते सहा महिन्यांची राहिली आहे, त्यांना सेवानिवृत्तीपूर्वी पदोन्नती मिळणे अपेक्षित होते. आता नवीन शैक्षणिक वर्षापासून पदोन्नतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असताना, काही वरिष्ठ केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा तोंडचा घास निवृत्त झाल्यास हिरावला जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदेने विस्तार अधिकार्‍यांची पदे तातडीने भरावीत, अशी केंद्रप्रमुखांच्या संघटनेची राज्य शासनाकडे मागणी आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 29 जुलै 2022 रोजी केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी ही पदे वर्ग 3 च्या समतुल्य असून, त्यांना वर्ग 2 मध्ये पदोन्नती देता येईल, असा आदेश दिला असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

खंडपीठाने योग्य ती कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागाला 12 आठवड्यांची मुदत दिली होती. आता मुदत संपून 5 महिने उलटून गेले आहेत. पात्र व्यक्तीला पदोन्नती मिळाल्यास त्यांना गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणा- धिकारी, डीन, शालेय पोषण अधीक्षक, वेतन आणि भविष्य निर्वाह निधी अधीक्षक इत्यादी पदांवर पदोन्नती मिळू शकते. ज्यांच्या निवृत्तीला अवघे काही महिने उरले आहेत, त्यांच्यासाठी ही सन्माननीय पदोन्नती मानली जाईल. पदोन्नती मिळाल्यास एक वेतनवाढ आणि नियमित मिळणारी वेतनवाढ, असा एकूण सहा हजार रुपयांचा मासिक फायदा पात्र व्यक्तीला होऊ शकतो.

जिल्ह्यामध्ये गटशिक्षणाधिकारी पदाच्या आठ जागा प्रभारी व्यक्ती सांभाळत आहेत. हे प्रभारीराज प्रशासनावर ताण पाडणारे व गुणवत्ता कमी करणारे आहे. विशेष म्हणजे राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यात खंडपीठाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली असताना, नगर जिल्हा मात्र याबाबतीत मागे आहे. त्यामुळे सुमारे 10 जागा रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. अनुभवी केंद्रप्रमुख पदोन्नतीनंतर आपल्या नवीन पदाला न्याय देतील, अशी त्यांची भावना आहे. दीर्घकाळ पदोन्नती न मिळाल्याने केंद्रप्रमुखांमध्येही नाराजी पसरली आहे.फ

केंद्रप्रमुख पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. नवीन शैक्षणिक वर्षात म्हणजेच जून महिन्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली जाईल.
                                         – भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Back to top button