नगर : माध्यमिक शिक्षण इमारतीचा स्लॅब कोसळला | पुढारी

नगर : माध्यमिक शिक्षण इमारतीचा स्लॅब कोसळला

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेच्या मुख्यालयावर लााखोंची उधळपट्टी सुरू असताना, माध्यमिक शिक्षण विभागाची इमारत मात्र दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. मंगळवारी मध्यरात्री उपशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने ही घटना कार्यालयीन वेळेत घडली नाही. अन्यथा दुर्घटना घडली असती. माध्यमिक शिक्षण विभागाची इमारत जीर्ण झालेली आहे. या इमारतीच्या दुरुस्तीचे अनेक प्रस्ताव आजही धुळखात पडून आहेत. शाखा अभियंता राऊत यांनी आपण याबाबतचा प्रस्ताव दक्षिण बांधकाम विभागाला दिला असल्याचे यापूर्वीच सांगितले होते.

मात्र अद्यापतरी हा प्रस्ताव अडगळीत पडला आहे. त्यामुळे इमारतीचा दुरुस्तीविषयी मागे पडला आहे. पावसाळ्यात कार्यालयातील संगणक व इतर दस्तावेज प्लॅस्टिक कागद टाकून संरक्षित करण्यात आला होता. असे असतानाही याकडे प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. मंगळवारी वादळी वार्‍यासह काही भागात पाऊस झाला. यात माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या कॅबीनमधील स्लॅब अचानक कोसळला. सकाळी कार्यालयात आल्यानंतर त्यांना स्लॅबचा काही भाग खाली विखुरलेला दिसला. सुदैवाने कार्यालयीन वेळेत ही घटना न घडल्याने अनर्थ टळला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आणि अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी तातडीने या इमारतीच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावी, अशी मागणी कर्मचार्‍यांमधून केली जात आहे.

Back to top button