नगर : अत्याचारप्रकरणी 20 वर्षे सक्तमजुरी | पुढारी

नगर : अत्याचारप्रकरणी 20 वर्षे सक्तमजुरी

नगर : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. शिवाजी भाऊराव सूर्यवंशी (रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या काकांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिली होती. तपासादरम्यान मुलगी मिळून आल्याने पोलिसांनी तिची चौकशी केली असता आरोपी शिवाजी सूर्यवंशी याला 2019 पासून ओळखत असल्याचे सांगितले.

तसेच, आरोपीचे लग्न झालेले असून त्याला तीन मुले असल्याचे सांगितले. पीडित मुलगी शेतात एकटी असताना आरोपी वेळोवेळी बोलण्याचा प्रयत्न करीत असे. जर तू माझ्याशी बोलली नाही तर मी आत्महत्या करेल व तुझे व तुझ्या आईवडिलांचे नाव चिठ्ठीमध्ये लिहिणार असल्याची धमकी आरोपीने मुलीला दिली होती. स्वतः विष पिऊन आत्महत्या करेल असे म्हणाला. 17 नोव्हेंबर 2021 आरोपी पीडितेला करमाळा (सोलापूर) येथे घेऊन गेला. तेथे एका शेतात मुलीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला, असे तपासात समोर आले. पोलिस उपनिरीक्षक निरीज बोकील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद व पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी बाजू मांडली.

Back to top button