नगर : कॉपीचे ‘गणित’ चुकले, बारा रिस्टिकेट | पुढारी

नगर : कॉपीचे ‘गणित’ चुकले, बारा रिस्टिकेट

नगर : पुढारी वृत्तसेवा : प्रशासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी पर्यवेक्षकांना तंबी भरल्यानंतर, कालही गणिताच्या पेपरला 12 कॉपीकेस आढळल्या आहेत. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी नगर तालुक्यात पाच, तर पारनेरमध्ये सात विद्यार्थ्यांना रिस्टिकेट केले.
शुक्रवारी गणिताचा पेपर होता. या पेपरला 26 हजार 692 परीक्षार्थी हजर होते, तर 230 विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवल्याचे पहायला मिळाले. काल दिवसभरात सीईओ आशिष येरेकर यांच्या सुचनांनुसार सर्वच पथके परीक्षा केंद्रांना भेटी देत होते.

बैठ पथकेही परीक्षार्थींच्या हालचालींवर नजर ठेवून होते. दरम्यान, कालच्या पेपरला 12 कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली आहे. यामध्ये उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, गटविकास अधिकारी किशोर माने, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, विस्तार अधिकारी पी.जी. पळसे यांनी पारनेर तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांवर पाहणी करताना 7 कॉपीकेसेस केल्या आहेत. दरम्यान, संबंधित परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकही कारवाईच्या फेर्‍यात अडकणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सीईओ येरेकर यांच्या आदेशाकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.

Back to top button